पान:माझे चिंतन.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विश्वाविरुद्ध १०७ 

 'मानवजाती याच तत्त्वान्वये आपले वर्तन ठेवील', हा रॉजर बेकन याचा आशावाद जगातील इतर देशांच्या बाबतीत जरी फारसा खरा ठरला नाही तरी त्याच्या मायदेशातील मानवजातीने तो पुरेपूर प्रत्यक्षात आणला. त्याच्या मृत्यूनंतर थोड्याच वर्षांनी जॉन वायक्लिफ (१३२४ - १३८४) याचा जन्म झाला व त्याने बेकनचे असिधाराव्रत पुढे चालविले. ख्रिस्ती धर्मातील कर्मकांडावर त्याने चरचरीत टीका केली, बायबलचे इंग्रजीत भाषांतर करून ते सर्वांना सुलभ करून दिले आणि विशेष म्हणजे पोपच्या अंतिम सत्तेवर आक्षेप घेतला. धर्मपीठाने संपत्तीपासून अलिप्त राहावे, मिळकती करू नयेत असे सांगून राष्ट्रीय धनाचा वाटा सर्वांना सारखा मिळावा अशी काहीशी समाजवादी मते त्याने प्रतिपादिली. अर्थात धर्माचार्यांना हे मानवण्याजोगे नव्हते. त्या काळात धर्माचार्यांच्यापुढे राजे लोकही चळचळा कापत असत. अशा त्या आचार्यांनी वायक्लिफला धर्मपीठापुढे खेचले. त्या वेळी त्याला अग्निप्रवेशाचीच शिक्षा व्हावयाची; पण जॉन ऑफ गाँट हा राजघराण्यातील पुरुष त्याच्याच मताचा होता व वायक्लिफला त्याचा पाठिंबा होता म्हणून तो वाचला; पण त्या दोघांच्या मागून, वायक्लिफचा जो लोलर्ड पंथ त्या पंथाच्या अनुयायांचे धर्माधिकाऱ्यांनी सत्र सुरू केले आणि शेकडो लोक चितेवर ठेवून जाळून मारले. या सर्वांनी आपली विवेकनिष्ठा न सोडता आनंदाने चितारोहण केले. जॉन बॅडबी याला याच प्रकारे देहान्तशासन झाले. देह जळू लागताच यातना असह्य होऊन तो ओरडू लागला तेव्हा याला पश्चात्ताप झाला आहे, असे समजून आचार्यांनी त्याला बाहेर काढले; पण तशाही स्थितीत त्या बहाद्दराने आपल्या मताचा आग्रह सोडला नाही, व तसाच तो पुन्हा चितेत शिरला. इंग्लंडला पुढे जे वैभव प्राप्त झाले त्याच्या मागे व्यक्तिस्वातंत्र्याची ही पुण्याई सतत उभी होती.

तिच्या अभावी

 चौदा पंधरा व सोळा ही शतके म्हणजे पश्चिम यूरोपच्या इतिहासातील ग्रीक विद्येच्या पुनरुज्जीवनाचा काळ होय. त्या काळाचे व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिनिष्ठा, विवेकनिष्ठा हे मुख्य लक्षण होते. इंग्लंडने त्या निष्ठेची जेवढ्या अनन्यभावाने उपासना केली तेवढ्या अनन्यतेने इतर कोणत्याही देशाने केली नाही. फ्रान्स, जर्मनी, हॉलंड, इटली, स्पेन, पोलंड या प्रत्येक देशात उज्जीवनाची लाट उस-