पान:माझे चिंतन.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १०६ माझे चिंतन

झाल्यावर तो आपले विचार उघडपणे बोलून दाखवू लागला तेव्हा धर्मपीठाचे अधिकारी त्याच्याकडे रोखून बघू लागले. स्वतः प्रयोग करणे, आपल्या बुद्धीचा वापर करणे हे त्यांना महापातक वाटत असे, आणि त्या कार्यासाठीच रॉजर बेकनचा अवतार होता. आता त्याचे जे ग्रंथ उपलब्ध झाले आहेत, त्यांवरून बंदुकीची दारू, दुर्बीण, वाफेचे यंत्र यांचा त्याने त्याच वेळी शोध लावला होता असे दिसते; पण त्या काळी त्याचे ग्रंथ कोणी वाचण्यासही तयार नसल्यामुळे आणि पुढे चारपाचशे वर्षे ते रोमच्या धर्ममंदिरातील कपाटात धूळ खात पडल्यामुळे त्याच्या या प्रचंड संशोधनाची लोकांना कल्पनाही आली नाही. त्याच्या समकालीनांनी एवढेच जाणले की, हा पाखंडी आहे; इतकेच नव्हे तर चेटक्याही आहे. विज्ञानसंशोधनाला प्रारंभीच्या काळी धर्मपीठाचा व सामान्य जनांचाही कडवा विरोध असण्याचे कारण असे की, विज्ञानातून काहीशी अतिमानुष शक्ती निर्माण होत असे, आणि अतिमानुष शक्ती ही परमेश्वर किंवा भूत, सैतान या दोषांच्या ठायीच असते अशी त्या काळी श्रद्धा होती. त्यामुळे प्रारंभीच्या शास्त्रज्ञांकडे लोक 'सैतानाचे दूत' अशा दृष्टीने पाहात आणि त्यांना चेटके ठरवून जिवंत जाळीत. रॉजर बेकन स्वतः फ्रान्सिस्कन पंथाचा धर्मगुरूच असल्यामुळे तो अग्निमुखातून सुटला इतकेच; पण आजन्म तुरुंगवास मात्र त्याच्या कपाळीचा टळला नाही. 'सत्यज्ञान' हे वेदवचनावरून मिळत नाही व अंधश्रद्धेनेही ते प्राप्त होत नाही; ते फक्त बुद्धी, स्वानुभव, चिंतन, प्रयोग यांनीच प्राप्त होते.' असे तो सांगत राहिल्यामुळे त्याच्या पंथाच्या आचार्यांनीच त्याला तुरुंगात डांबून टाकले. जगाला ज्ञानकिरणांनी उजळून टाकणाऱ्या या महाभागाच्या आयुष्याची चोवीस वर्षे अंधारकोठडीत गेली; तेथेच शेवटी त्याचा अंत झाला. मरताना त्याने आपल्या शिष्यांना पुढील संदेश दिला; 'स्वतंत्र संशोधनाच्या मानवाच्या हक्कासाठी मी आत्मबलिदान करीत आहे. येथून पुढे मानवजाती याच तत्त्वान्वये आपले वर्तन ठेवील अशी मला आशा आहे. प्रयोग करून पाहणे, ते करीत असताना प्रमाद करण्यासही अवसर असणे, पुन्हा प्रयोग करणे, पडताळा पाहणे याची संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे, हे शास्त्रज्ञांचे ब्रीदवाक्य आहे. आपण शतकानुशतके याच मार्गाने जाऊ या. अर्थव्यवस्था, राज्यपद्धती, समाजरचना, दण्डनीती या सर्व बाबतींत आपण सारखे प्रयोग, पुन्हा प्रयोग याच धोरणाचा अवलंब करू. म्हणजे शेवटी यातूनच मानवाला उत्कर्षाचा मार्ग सापडेल.'