पान:माझे चिंतन.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विश्वाविरुद्ध १०५ 

कार म्हणतो, 'आपण एकाकी आहोत हे जाणूनही ज्याचे धैर्य खचत नाही, अशा स्थितीतही जो स्वतःला समर्थ मानतो तो खरा धैर्यशील पुरुष होय.'
 आपल्या मतासाठी मृत्यू पतकरावयाचा ही संस्कृती सॉक्रेटिसाने प्रथम जगात आणली. त्याने ही गोष्ट जाणूनबुजून, बुद्धिपुरःसर केली होती. शिक्षा झाल्यावर त्याला काही दिवस तुरुंगात ठेविले होते. तेथून त्याला सहज पळून जाता आले असते. प्लेटोने त्याची सर्व व्यवस्था केली होती. अधिकाऱ्यांचीही त्याने पळून जावे अशीच इच्छा होती. कारण त्यांना त्याच्या देहान्तशासनाची अंमलबजावणी करण्याची जरा भीतीच वाटत होती. म्हणून अप्रत्यक्ष रीतीने मदत करण्यास तेही तयार होते; पण सॉक्रेटिसाने ते साफ नाकारले. तो म्हणाला, आता मी येथून जाईन तो अशाच प्रदेशात की जेथे मतासाठी देहदंड सोसावा लागत नाही.'

स्वतंत्र चिंतन

 सॉक्रेटिसाची ही परंपरा मध्यंतरी काही शतके लुप्त झाली होती. आणि ही विवेकनिष्ठा लुप्त होती तोपर्यंय युरोपची सर्व प्रगतीही कुंठित होऊन बसली होती. जगाच्या पाठीवरील प्रत्येक देशाच्या इतिहासावरून हे स्पष्ट दाखविता येईल की, स्वतंत्र चिंतनाला, अवलोकनाला, अनुभूतीला व अनुभूतीतून प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या प्रसाराला जितका, ज्या प्रमाणात व ज्या क्षेत्रात अवसर मिळतो तितका, त्या प्रमाणात व त्या क्षेत्रात समाजाचा उत्कर्ष होतो. हे स्वतंत्र चिंतन व संशोधन जेथे कोणत्याही कारणाने का होईना, मुळीच होत नाही तो समाज रानटी, पाशवी स्थितीला गेलेला असतो. चौथ्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत युरोपची हीच स्थिती होती. अशा स्थितीत ज्या देशांत कोणी सॉक्रेटिस निर्माण झाला नाही ते देश परवापरवापर्यंत दास्य, विघटना, दारिद्र्य या कर्दमात लोळत पडले होते. इंग्लंडचे भाग्य असे की, तमोयुगानंतरचा पहिला सॉक्रेटिस- बुद्धिनिष्ठेपायी आत्मबलिदान करणारा पुरुष- त्या भूमीत निर्माण झाला. त्याचे नाव रॉजर वेकन (१२९४- १२९४). ऑक्सफर्ड येथे विद्यार्थी असतानाच आपल्या गुरुजींची अंधश्रद्धा त्याला पटेना. त्या लहान वयातच ॲरिस्टाटलचे वचन, त्याचे सिद्धान्त स्वतः प्रयोग करून पाहिल्याशिवाय मी मानणार नाही, असा पीळ त्याच्या मनात निर्माण झाला. पुढे पॅरिसच्या विद्यापीठात प्राध्यापक