पान:माझे चिंतन.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १०४ माझे चिंतन

लढ्याचे स्वरूप अत्यंत उग्र व भयावह असेच होते. टिळकांना त्यात यातनाही अपरिमित सोसाव्या लागल्या. पण हा संग्राम चालू असताना आरंभापासूनच टिळकांचे स्वजन- महाराष्ट्रीय जनता- त्यांच्या पाठीशी उभे होते. पुढे पुढे तर अखिल भरतभूमी त्यांना आशीर्वाद देत होती. आगरकरांचा लढा याहून अगदी निराळा होता. त्यांना स्वजनांशीच संग्राम करावयाचा होता. त्यांच्यामागे कोणीही उभे नव्हते. त्यांना साह्य फक्त त्यांच्या विवेकदेवतेचे होते. व्यक्ती विरुद्ध अखिल समाज असा तो लढा होता. ब्रिटिश साम्राज्य नष्ट व्हावे अशी इच्छा करणारे हजारो, लाखो लोक टिळकांच्या मागे उभे होते; मनूचे साम्राज्य नष्ट व्हावे या गोष्टीला कोणाचाच पाठिंबा नव्हता. ती कल्पनाच लोकांना असह्य होती. तिला आगरकरांचा, त्यांच्या विवेकाचा पाठिंबा होता. त्यांच्या संग्रामातील अपूर्वता ती हीच होय.

मार्टिन लूथर

 या लढ्यातला एकाकीपणा फार भयानक असतो. मनुष्य त्यानेच हैराण होऊन जातो. मार्टिन लूथरवर पोपने बहिष्कार घातला त्या वेळी त्याच्या मनाची अवस्था कशी झाली त्याचे वर्णन त्याच्या चरित्रकाराने केले आहे. सर्व जगात आपण एकटेच आहोत या विचाराने क्षणभर तो हादरून गेला. सर्वत्र अंधार, भयाण शून्यता ! लूथरने स्वतःच आपल्या मनाच्या दारुण व्यग्रतेचे वर्णन केले आहे : प्रत्यक्ष परमेश्वराची वाणी, बायबल माझ्या बाजूस होते तरी पोपच्या विरुद्ध उभे राहताना माझ्या मनाला किती यातना झाल्या! किती वेळा तरी तो भयंकर प्रश्न मी माझ्या मनाला विचारला ! जगात तूच एकटा शहाणा आहेस काय ? बाकी सर्व लोक इतके मूढ असतील ? शतकानुशतकांची ही परंपरा- ही सर्व चुकलेली असणे शक्य आहे ? आणि शेवटी तुझेच मत चुकीचे होते असे ठरले तर ? पोपच्या बाजूला कोणती सेना आहे ? विद्वत्ता, प्रतिभा, प्रतिष्ठा, सत्ता, पावित्र्य, चमत्कारसामर्थ्य, राजवैभव, बहुसंख्य जनता, शतकांची पुण्याई, थोर हुतात्म्यांचा आशीर्वाद, सर्व धर्ममहामंडळे, सर्व धर्मगुरु आणि रोमचे पीठ!- आणि माझ्या बाजूला? वायक्लिफ, लोरेंझव्हॅला यांची पुस्तके आणि चारदोन मित्र. असा हा संग्राम आहे."
 असे असूनही लूथरने ते बहिष्कारपत्र अग्नीत फेकून दिले. लूथरचा चरित्र-