पान:माझे चिंतन.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १०२ माझे चिंतन

भवांवरून नीतिनियम ठरवावे असा त्याचा आग्रह होता. अर्थातच व्यक्तीचा विवेक हे नीतीचे अधिष्ठान ठरले. आता या प्रतिपादनात नीती व देव यांविषयीच्या रूढ कल्पनांवर प्रत्यक्ष हल्ला केला नसला तरी त्याचा परिणाम तोच झाला. कारण बुद्धीचा निकष लावल्याबरोबर प्रस्थापित नीतितत्त्वांवरील तरुणांची श्रद्धा ढळणे अपरिहार्य होते. त्याचप्रमाणे विवेकाचा नेत्र उघडताच ग्रीक देवतांविषयीची भाविक, भोळी श्रद्धा जशीच्या तशी टिकून राहणे शक्य नव्हते. सनातनी लोकांच्या मते याचाच अर्थ तरुणांना बिघडविणे व पाखंड माजविणे असा होत होता, व यासाठीच त्यांनी सॉक्रेटिसला न्यायासनापुढे खेचले होते. अनिटस, मेनिटस, लिकॉम प्रभृती लोकसभेच्या नेत्यांनी यात पुढाकार घेतला होता. त्यांना व इतर सभासदांना उद्देशून विवेकवादाचा, बुद्धिनिष्ठेचा हा आद्यप्रणेता म्हणाला-
 "माझ्या अथेन्सकर मित्रांनो ! मागे अँफिपोलिसच्या व डेलियमच्या रणांगणांवर मी सैनिक म्हणून लढत असताना आपल्या सेनापतींनी मला एका जागी ठासून उभे राहण्यास सांगितले होते. त्या वेळी मृत्यू समोर दिसत असूनही ती आज्ञा मी धैर्याने पाळली; जागचा हाललो नाही. आज तर माझ्या विवेकाला परमेश्वराची आज्ञा झालेली आहे. 'स्वतःच्या व इतरांच्या अंतरात्म्यांचे संशोधन करण्याचे तत्त्ववेत्त्याचे कार्य तू कर,' अशी ती आज्ञा आहे. ही आज्ञा मी त्याच निष्ठेने पाळली नाही तर ते फारच विचित्र होईल. आज तुम्ही एखादे वेळी म्हणाल की, 'सॉक्रेटिस, एक वेळ आम्ही तुझी गय करतो, पण तू पुन्हा मात्र असली बौद्धिक चिकित्सा व संशोधन करता कामा नये.' असे तुम्ही म्हणालात तर यावर माझे उत्तर असे आहे: अथीनी मित्रांनो, माझा तुमच्यावर लोभ आहे, प्रेम आहे; पण तुमच्यापेक्षा मी माझ्या चित्तात स्फुरणारी परमेश्वराची आज्ञाच जास्त मानीन. आणि जोपर्यंत जिवात जीव आहे व वाचेत बळ आहे तोपर्यंत लोकांना माझे तत्त्वज्ञान शिकविण्यापासून कधीही परावृत्त होणार नाही. तेव्हा मला मुक्त करा वा न करा; पण एवढे ध्यानात ठेवा की, तुम्ही कोणताही निर्णय घेतला तरी मी माझा मार्ग सोडणार नाही. मग शंभर वेळा मृत्यू पत्करावा लागला तरी चिंता नाही."
 सॉक्रेटिसाने विवेकनिष्ठेसाठी, स्वतःच्या मतासाठी मृत्यू पत्करला या गोष्टीमुळे जगाच्या इतिहासाचा प्रवाह बदलून गेला.