पान:माझे चिंतन.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे






विश्वाविरुद्ध






एक नवी शक्ती
 इ. स. पूर्व ३९९ या सालच्या एका दिवशी अथेन्स नगरीच्या लोकसभेत जगाचा इतिहास घडविला जात होता. मानवी संस्कृतीची तोपर्यंत प्रगती चालू होतीच; पण त्या दिवशी त्या लोकसभेत ही प्रगती अत्यंत वेगाने चालविणारी शक्ती निर्माण होत होती. विवेकनिष्ठा हे त्या शक्तीचे नाव. सर्व विश्व आपल्या विरुद्ध असले तरी आपल्या विवेकाच्या बळावर त्या विश्वाचा मुळीच मुलाहिजा न करता, आपले मत आग्रहाने प्रतिपादन करण्याचे व त्यासाठी देहदंड सोसण्याचे मनः सामर्थ्य जगाच्या संसाराच्या इतिहासात मानव त्या दिवशी प्रथमच प्रगट करीत होता. अथेन्समधील लोकसभेच्या नेत्यांनी सॉक्रेटिसावर अभियोग चालविला होता. अखिल राष्ट्राला मान्य असलेल्या देवता हा मानीत नाही व रूढ नीतीपासून तरुणांना च्युत करतो, वाममार्गाला नेतो असे त्याच्यावर आरोप होते. वास्तविक सॉक्रेटिस ग्रीक देवता मानीत नव्हता असे नाही; पण प्रत्येकाने आपल्या विवेकबुद्धीच्या निकषावर कोणतेही तत्त्व- देवाचे अस्तित्वसुद्धा- पारखून पाहावे असे तो सांगत असे. एखादी गोष्ट देवांना प्रिय आहे म्हणून ती शुभ व आदरणीय ठरत नसून ती गोष्ट शुभ व आदरणीय आहे म्हणून ती देवांना प्रिय होते असे काहीसे उपयुक्ततावादासारखे प्रतिपादन तो करीत असे. ज्ञान हा अत्यंत मोठा सद्गुण व अज्ञान हा अत्यंत घातक दुर्गुण होय हा विचार तो आपल्या शिष्यांना शिकवी. नीतीच्याही बाबतीत हेच होते. रूढ नीतिनियम पाळू नयेत असे तो कधीच म्हणाला नाही; पण नीतिकल्पनांना अतीन्द्रिय, गूढ, दैवी शक्तींचा म्हणजे देवाच्या वचनांचा आधार अवश्य नाही, ऐतिहासिक व सामाजिक अनु-