पान:माझे चिंतन.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ९८ माझे चिंतन

मर्मघातक आणि प्रेम किंवा द्वेष अगदी एकांतिकपणे व्यक्त करणारा असा असे. हस्तिनापुराला गेला असताना दुर्योधनाने श्रीकृष्णाला भोजनाचे आमंत्रण दिले. प्रथम साधे कारण सांगून त्याने नकार दिला; पण दुर्योधनाने पुन्हा आग्रह करताच श्रीकृष्णाने ताडकन उत्तर दिले, 'अरे, दुसऱ्याच्या घरी जेवावयास जातात ते प्रेम असले तर किंवा आपल्या घरी अन्न मिळत नसले तर जातात. येथे तुझ्यामाझ्यांत प्रेम नाही आणि मी अन्नाला अजून महाग झालेला नाही.' श्रीकृष्ण कौरवांकडे जाऊन समेट करील व आपल्या अपमानाचा सूड घेतला जाणार नाही अशी द्रौपदीला भीती वाटली व अत्यंत संतापून जाऊन तिने कृष्णाचीही निर्भर्त्सना केली. त्यावेळी श्रीकृष्णाने तिला सांगितले, 'कृष्णे, भिऊ नको. कौरव स्त्रिया विधवा होऊन रडत असलेल्या लवकरच तुझ्या दृष्टीस पडतील. कालपक्व असे धार्तराष्ट्र जर माझे म्हणणे ऐकणार नाहीत तर रणांगणात मरून पडतील आणि त्यांची प्रेते कोल्हेकुत्री खातील याविषयी शंका बाळगू नको. हिमालयसुद्धा एखादे वेळी चलित होईल, पण माझे बोलणे निष्फळ होणार नाही.' आपल्या प्रिय भगिनीवरचे गाढ प्रेम आणि कौरवांबद्दलचा तितकाच तीव्र द्वेष या भाषणातून कमालीच्या उत्कटतेने व्यक्त होतो. रागद्वेषाची ही उत्कटता हे श्रीकृष्णाच्या लोकोत्तर सामर्थ्याचे एक रहस्य होते. तो ज्यांना जवळ करी त्यांच्यासाठी प्राणही वेचण्यास तो सदा सिद्ध असे, आणि ज्यांचा तो द्वेष करी त्यांचे निर्दाळण करून टाकावे हीच त्याची वृत्ती असे. 'न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ।' हे वचन त्याच्या स्वभावाला मुळीच लागू पडणार नाही. एकंदर मानवी व्यवहारात उत्कट रागद्वेष याच प्रबल अशा प्रेरणा असतात. या प्रेरणांनी श्रीकृष्णाचे मन पूर्ण संपन्न होते असे त्याच्या अनेक प्रसंगींच्या उद्गारांवरून दिसते.

देव नव्हे- मानव

 या त्याच्या तीव्र प्रवृत्तीवरूनच श्रीकृष्ण हा कोणी देवकोटीतला पुरुष नसून मानवी गुणांनी नटलेला, मानवी भावनांनी संपन्न असलेला, मानवी मर्यादांतच रमणारा, तुमच्याआमच्यासारखाच विकारविचारांच्या आहारी असलेला, पण या सामान्यांतच असामान्य उंचीला व लोकविलक्षण पदवीला गेलेला असा पुरुष होता, हे स्पष्टपणे ध्यानात येते. मध्यंतरीच्या काळात त्याला परमेश्वररूप आणले