पान:माझे चिंतन.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भगवान श्रीकृष्ण ९७ 

केले आहे. 'श्रीकृष्णाचा स्वर मेघासारखा गंभीर होता. स्वराची उंची कमी न होता तो एकसारखा बोलू शकत असे. त्याचे वर्णोच्चार योग्य त्याच स्थानातून होत. ते नेहमी हेतुयुक्त, अर्थसंपन्न असून त्यात गोंधळ कधी नसे. (उद्योग. ९१- १७, १८). स्वतः तो एक महान तत्त्ववेत्ता असल्यामुळे जगाला शाश्वत सत्ये सांगण्याच्या भूमिकेतूनच तो नेहमी बोलत असे. दीर्घकाल चिंतन करून मनाशी निश्चित केलेले सिद्धान्त त्याच्या वाणीच्या ओघातून मोठ्या प्रतिष्ठेने बाहेर पडत आणि जग त्यांना शिरसावंद्य मानी. श्रीकृष्ण बोलू लागला की शाश्वदर्थ- संपन्न असे एखादे सुभाषित त्याच्या मुखातून ऐकण्यास मिळणारच, अशी लोकांची खात्री असे. 'जो समर्थ असतो व जगाला वश करू शकतो त्यालाच साम्राज्य प्रप्त होते' 'हे राजा, बालिश पुरुष परिणामाकडे लक्ष न देता एकाएकी कार्याला हात घालतो, म्हणून अशा बालिश शत्रूचा कोणी विचारही करीत नाही' 'कर्माला अनुकूल अशा ज्या विद्या त्याच सफल होत असतात. कर्म न करता संन्यासच जो श्रेष्ठ मानतो त्या दुर्बल पुरुषाचे बरळणे व्यर्थ आहे.' अशा तऱ्हेची शाश्वत सत्ये श्रीकृष्णाच्या मुखातून नित्य बाहेर पडत आणि त्यांच्या मागे दीर्घ चिंतन व विपुल अनुभव याची पुण्याई उभी असल्यामुळे ती आजही जगाच्या आदराला पात्र झालेली आहेत.

उत्कट रागद्वेष

 मानवी स्वभावाची घडण हा विधात्याचा एक चमत्कार आहे. अत्यंत भिन्न किंवा अगदी परस्परविरोधी असेही गुण मानवाच्या ठायी अविरोधाने नांदू शकतात; इतकेच नव्हे तर केव्हा केव्हा परस्परांना पोषक होतात हे पाहून व वाटतो. श्रीकृष्णाचे चरित्र पाहता असे दिसते, की विवेक, व्यवहारदृष्टी, स्थिर प्रज्ञा हाच त्याच्या प्रकृतीचा स्थायीभाव होता. अशा या पुरुषाचे व्यक्तिगत जीवनातले रागद्वेष अत्यंत तीव्र होते हे पाहून मन विस्मयाने व आनंदाने भरून जाते. विचारशील मनुष्य सहसा विकारांच्या अधीन होत नाही. इतकेच नव्हे तर त्याचे विकार फारसे उत्कट रूपही धारण करीत नाहीत. त्याच्या विकारांच्या धारा बऱ्याच बोथट झालेल्या असतात आणि त्याचे विकाराचे बोलणेही सौम्य, समतोल व समन्वयी असे असते. श्रीकृष्ण याला अपवाद होता. त्याच्या बोलण्याला बहुतेक वेळा अगदी जहरी अशी धार असे व त्यातील अर्थ भेदक,