पान:माझे चिंतन.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भगवान श्रीकृष्ण ९९ 

गेल्यामुळे त्याच्या जीवनातले हे वैशिष्ट्य दुर्लक्षिले गेले होते. पण महामती वेद- व्यासांनी या पुरुषाचे चरित्र वर्णिताना असे दुर्लक्ष केलेले नाही हे आपले भाग्य होय. महाभारतातला श्रीकृष्ण हा या अपूर्ण जगातील अपूर्ण असाच मानव होता याविषयी शंका घेण्यास व्यासांनी जागा ठेवलेली नाही. जरासंधाविषयी बोलताना 'सतत तीनशे वर्षे याच्याशी झुंजत राहिलो तरी त्याचा पराभव करण्यास आपण समर्थ होणार नाही हे आम्ही जाणले व त्याच्या भयामुळे ज्ञातिबांधवांसह आम्ही मथुरेतून पळून जाऊन द्वारका नगरीत राहिलो.' असे श्रीकृष्णाने प्रांजलपणे युधिष्ठिरास सांगून टाकले. युद्धाचे प्रयत्न सुरू झाले त्या वेळी कृष्णाने अनेक प्रसंगी जे उद्गार काढले त्यावरून अतिमानुष शक्ती गृहीत धरून हा बोलत आहे अशी शंकासुद्धा येत नाही. 'हा घोर अनर्थ ओढवला आहे. याचा परिणाम काय होईल, यशस्वी कोण होईल हे काही सांगता येत नाही. मानवाला जेवढे शक्य आहे तेवढे मी करीन, परंतु प्राक्तन मला हाणून पाडता येणार नाही,' असे श्रीकृष्णाचे उद्गार आहेत. अर्जुनाने जयद्रथवधाची प्रतिज्ञा केलेली कळताच श्रीकृष्ण अत्यंत चिंताक्रांत झाला. 'अर्जुना, तू हा मोठा अविचार केलास. आमचा सल्ला न घेता तू हे करावयास नको होतेस. अरे, उद्या संध्याकाळच्या आत जयद्रधाचा वध करणे किती अशक्य आहे याची तुला कल्पना नाही.' असे कृष्ण म्हणाला, आणि त्या रात्री श्रीकृष्णाला या काळजीमुळे झोप आली नाही. या व अशा तऱ्हेच्या अनेक प्रसंगांवरून श्रीकृष्णाचे चरित्र पूर्णपणे मानवकोटीत येऊन पडते आणि त्यामुळे त्या दिव्य व अलौकिक चरित्राचे वैभव शतगुणित होते.
  महाभारत हे या भरतभूमीचे वैभव आहे; आणि भगवान श्रीकृष्ण हे त्या महाभारताचे वैभव आहे. महाभारताच्या सुवर्णकोंदणात बसविलेला हा कौस्तुभ आज हजारो वर्षांनंतरही आपल्या भास्वर दीप्तीने व अव्यय तेजाने जगाला धवळून टाकीत आहे. जगामधल्या अनेक देशांतील इतिहासपूर्व काळातील वाङ्मय आज उपलब्ध झाले आहे. त्यापैकी कोणत्याही ग्रंथात असले दिव्य चरित्र आपणांस पाहावयास सापडत नाही. मानवी व्यवहाराचे सूक्ष्म आकलन, धर्मा- धर्माचा निश्चय करणारी परिणत प्रज्ञा, अधिकारवाणीने त्या धर्माचे प्रवचन करण्याइतकी चारित्र्याची उंची, लोकसंग्रहाची तळमळ, अमोघ वाणी इतके सर्व गुण त्या मागल्या काळात एकवटलेले पाहून मन विस्मित होऊन जाते,