पान:माझे चिंतन.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ९६ माझे चिंतन

णार नाही; अन्यायाने लढणे प्राप्त आहे', असा अनेकदा त्याने उपदेश केला आहे. अशा वेळी याला स्वतःला सार्वभौमपदाचा अभिलाष आहे अशी शंका जरी कोणाला आली असती तरी त्याच्या वाणीला कसलेच यश आले नसते. पण असे प्रतिपादन तो करीत असताही साऱ्या भरतभूमीत त्याच्या लोकहितबुद्धीविषयी कोणाला शंका आली नाही. 'जे लोकहिताला अनुकूल तेच सत्य', 'जे प्राण्यांना उत्कर्षकारक तेच धर्मपूत' हे त्याचे विचार स्वार्थमूलक नसून त्यामागे समाजाच्या हिताची पराकाष्ठेची तळमळ आहे, हीच प्रतीती भारतीय प्रजांना त्या काळी येत होती आणि म्हणूनच प्रत्यक्ष सार्वभौम न होताही तो तत्कालीन भारताचा अनभिषिक्त सम्राट झाला होता. त्याचे धर्मप्रवचन ऐकण्यास अखिल भरतभू त्या वेळी उत्सुक असे. श्रीकृष्ण येणार ही वार्ता पसरताच मैलोमैल रस्ता तुडवीत येऊन लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहात. दूरदूरची अंतरे तोडून विद्वान लोक त्याचे भाषण श्रवण करण्यास येत आणि ते ऐकण्यातच स्वतःच्या जीविताची सफलता मानीत.

वाणीचे शिल्प

 आणि खरोखरच, भरतखंडाच्या इतिहासात श्रीकृष्णाची एक थोर वक्ता म्हणून अग्रमालिकेत गणना करावी लागेल. श्रीकृष्णाचे एकेक भाषण म्हणजे वाणीच्या शिल्पाचा एकेक नमुनाच असे. शिल्पकाराने एखादी घडीव मूर्ती आपल्यापुढे उभी केली आहे असे त्याच्या श्रोत्यांना वाटत असे. मीमांसेत उपक्रमोपसंहाराचे जे महत्त्व वर्णिले आहे ते श्रीकृष्णाच्या भाषणाचा आदर्श पुढे ठेवूनच वर्णिले असेल, असे म्हणावयास हरकत नाही. कौरवसभेत उभा राहताच पहिल्याच वाक्यात त्याने आपल्या आगमनाचा हेतू व विचाराचा व्याप स्पष्ट करून सांगितला. 'कौरव आणि पांडव यांचा साम व्हावा, युद्ध होऊ नये, वीरांचा प्राणनाश होऊ नसे, अशी प्रार्थना करण्यासाठी मी आलो आहे' असे त्याचे पहिले वाक्य आहे आणि शेवटीही समारोप तसाच निःसंदिग्ध व सर्व भाषणाचा सारार्थरूप आहे. 'पांडव तुझी सेवा करावयास सिद्ध आहेत किंवा तुझ्याशी युद्धही करावयास तयार आहेत. हे धृतराष्ट्रा, यांतले तुला काय रुचत असेल ते सांग.' श्रीकृष्णाची महाभारतातील सर्वच भाषणे अशी सुबद्ध, आखीव व शिल्पयुक्त आहेत. स्वतः भारतकारांनी त्याच्या वक्तृत्वाचे मोठे सुंदर वर्णन