पान:माझे चिंतन.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भगवान श्रीकृष्ण ९५ 

कधी इच्छा केली नाही. बुद्धिमत्ता, सेनासामर्थ्य व धनसमृद्धी इत्यादी सम्राटपदे जिंकण्यासाठी लागणारे सर्व गुण त्याच्या ठायी होते. ज्या युधिष्ठिराने सार्वभौम व्हावे अशी त्याची इच्छा होती, त्याने एका पायावर कृष्णाचे सार्वभौमत्व मान्य केले असते. असे असूनही श्रीकृष्णाने तो अभिलाष कधी धरला नाही. जरासंघाला मारून ८६ राजांना त्याने बंधमुक्त केले त्यावेळी अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्यांनी 'आम्हांस काही सेवा सांगा' असे विनविले. त्यावेळी तुम्ही सर्वांनी युधिष्ठिरास साह्य करावे, अशी त्याने त्यांना आज्ञा दिली आणि स्वतःला अर्पण केलेली रत्नेही त्याने त्यांची दया येऊन मोठ्या कष्टाने स्वीकारली (सभा. २४- ३९). जरासंधाचे राज्यही त्याने खालसा केले नाही; ते त्याच्या पुत्राला दिले. ते श्रीकृष्णाची ही विशुद्ध बुद्धी त्याच्या प्रत्येक कृतीतून व्यक्त होते. कौरव-पांडवांचा समेट घडावा म्हणून बोलणी चालली असताना 'धर्मराजाच्या आज्ञेबाहेर मला जाता येणार नाही' असे इतरांना त्याने अनेक वेळा निक्षून सांगितले आहे. कर्णाने पांडवांकडे यावे म्हणून त्याचे मन वळवीत असतानाही 'तू इंद्रप्रस्थाचा स्वामी झालास तर समस्त यादवांसह मी तुझा अनुपायी होईन' असे अभिवचन कृष्णाने त्यास दिले होते.

एकांतिक पावित्र्य

 श्रीकृष्णाने सार्वभौमपदांचा लोभ मनातून काढून टाकला तो आपल्या जीवितकार्याचा विचार करून, त्या थोर ध्येयाला तो मारक होईल हे मनाशी निश्चित ठरवूनच काढून टाकला असावा असे वाटते. त्याला लोकांना कठोर व्यवहार, नीतीचा उपदेश करावयाचा होता. समाजरक्षण हे त्याचे ध्येय होते आणि या हेतूच्या सिद्ध्यर्थ कंटकांचे व दुष्कृतांचे निर्दाळण करणे अवश्य आहे हे त्याने जाणले होते. दुष्कृतांचे निर्दाळण सत्याच्या व एकांतिक पावित्र्याच्या आश्रयाने कधीच होत नाही, ही मानवी इतिहासातील दुःखद उणीव ध्यानात आल्यामुळे सत्याच्या व पावित्र्याच्या रक्षणासाठीच त्यांना व्यवहारात मुरड घालणे अवश्य आहे, तसे न केल्यास या अनीतिमय जगात दुष्ट- चांडाळांचे वर्चस्व होऊन समाज रसातळाला जातो, प्रजा उत्सन्न होतात, हा त्याच्या बुद्धीचा निश्चय झाला होता. यामुळेच 'कित्येक वेळा असत्य हे सत्यापेक्षा श्रेष्ठ असते' 'या वेळी धर्म सोडूनच लढणे अवश्य आहे', 'भीमसेन धर्माने लढेल तर त्याला जय मिळ-