पान:माझे चिंतन.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ९४ माझे चिंतन

होता; नाही असे नाही 'काममूढ पित्याचीसुद्धा आज्ञा पाळावयाची ही तुझी फाजील धर्मनिष्ठा असून ती अत्यंत निंद्य आहे' असे लक्ष्मण रामचंद्राला अनेक वेळा सांगत असे (अयोध्याकांड २३.१४). पण लक्ष्मणाची भूमिका व पुण्याई लहान असल्यामुळे तो रामचंद्राचे मन वळवू शकला नाही. श्रीकृष्णाने आपल्या थोर पुण्याईने हे व्यवहारज्ञान समाजाला शिकविले व भारतीय समाज एकांतिक अव्यवहार्य सत्यनिष्ठेने उत्सन्न होऊ नये यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

क्षात्र संघटना

 त्या काळच्या उत्तर भारतात जरासंघ, कंस, शिशुपाल यांसारखे अन्यायी, जुलमी व मदांध असे अनेक राजे होते. अशा राजांच्या सत्तांचा उच्छेद करून सर्व क्षत्रियमंडळात एक शिस्त निर्माण करावी, त्यांच्यांतील कलह नाहीसे करून सख्य घडवून आणून, सर्वत्र शांतता प्रस्थापित करावी आणि अशा रीतीने भारतीय समाजाची सुस्थिती राखावी हे श्रीकृष्णाचे जीवितकार्य होते. राजसूय यज्ञाचे आधी जरासंधाचा वध करणे अवश्य आहे असे त्याने युधिष्ठिराला सांगितले त्याचे कारण हेच होते. हा जरासंध पाशवी सामर्थ्याच्या जोरावर अनेक राजांना बंदिवान करीत असे. त्यांचे राज्य लुटीत असे. असे ८६ राजे त्याने कैदेत टाकले होते व तसे शंभर झाल्यावर तो त्यांना शंकरापुढे बळी देणार होता. अशा वेळी आपल्या या ज्ञातिबांधवांचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे आणि ते करीत असता मृत्यू आला तरी पत्करला पाहिजे, अशी कृष्णाची भूमिका होती (सभा- १५. २४-२५) क्षत्रिय- राजमंडळाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे याची कृष्णाला नित्य रुखरूख होती. जरासंधाशी बोलताना त्याने ते स्पष्ट करून सांगितले आहे. 'हे राजा, तू निरुपद्रवी राजांची हिंसा करीत आहेस. आम्ही धर्मरक्षण करण्यास समर्थ आहोत. आणि अशा वेळी ते आम्ही केले नाही तर तुझे पातक आम्हांला लागेल.-' (अस्मान् तद् एनोपगच्छेत्) या जाणिवेमुळेच श्रीकृष्ण जरासंधवधास उद्युक्त झाला होता. (सभा, २२-९)
 जरासंध वधाचे वेळी, पुढे कौरवपांडवांचे युद्धात व इतरही अनेक प्रसंगी श्रीकृष्णाने जे सामदामदण्डाचे प्रयत्न केले ते पूर्ण निःस्वार्थी हेतूने केलेले होते. भारतातील क्षत्रियमंडळाचे सार्वभौमपद आपण घ्यावे अशी चुकूनसुद्धा त्याने