पान:माझे चिंतन.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भगवान श्रीकृष्ण ९३ 

तेच्या मर्यादा त्याने पूर्णपणे जाणल्या होत्या. तारतम्याचे अवलोकन हे त्याच्या बुद्धीचे वैशिष्ट्य होते. त्यामुळे अर्वाचीन काळच्या युटिलिटेरियन किंवा याहूनही निश्चित म्हणजे प्रॅग्मॅटिस्ट पंथासारखी त्याची धर्मविषयक विचारसरणी होती. व्यवहारपांडित्य हा तिचा सारार्थ आहे. मानवी जीवनात नेहमी सत्याचाच जय होतो असे नाही, निष्पापता हीच विजयी होते असे नाही, नीतियुक्त आचरण हेच फलदायी ठरते असे नाही, हे त्या मानवव्यवहारवेत्त्याने चांगले जाणले होते. आणि त्यामुळे समाजरक्षणासाठी अनेक वेळा असत्याचा, अधर्माचा आश्रय करणे भाग पडते, असे त्याने अनेकवार सांगितलेले आढळते. द्रोणाला फसवून मारणे हा अधर्म होय, हे त्याला मान्य होते. यामुळे धर्मराजाचा त्या वेळपर्यंत अधांतरी चालणारा रथ हा भूमीवरून चालू लागेल हेही त्याला दिसत होते; पण फसवणूक केली नाही तर तो रथ जमिनीत गाडला जाईल हेही त्याला कळत होते. म्हणून 'हे पांडवहो, आता तुम्ही धर्ममार्ग सोडूनच युद्ध करा-' 'आस्थीयतां जये योगो धर्ममुसृज्य पांडवाः । (द्रोणपर्व १९१.११) ।' 'अशा वेळी असत्य हे सत्यापेक्षा श्रेष्ठ होय-' 'सत्यात् ज्यायः अनृतं वचः' (द्रोण १९१-४७) असा अत्यंत स्पष्ट शब्दांत त्याने उपदेश केलेला आहे. जयद्रथ- वधाचे वेळी, दुर्योधनाच्या वधाच्या वेळी व इतरही अनेक प्रसंगी कृष्णाने हेच धोरण ठेविले आणि, मी अशा तऱ्हेने कपटाचा आश्रय केला नसता तर धन, राज्य, विजय, समृद्धी ही मिळाली नसती, (शल्य ६१-६४) असे आपल्या कृत्याचे समर्थनही केले. व्यवहारपांडित्य किंवा तारतम्यज्ञान ते हेच होय. भीष्मद्रोण यांसारखे महात्मेसुद्धा अन्याय, जुलूम, अत्याचार, अधर्म यांच्या बाजूने उभे राहू शकतात हे मानवी जीवनातले महान वैगुण्य आहे. धर्मयुद्ध करून याचा निर्णय करावा तर युद्धात नेहमी सत्याचाच जय होतो असे नाही. युद्धात काहीही घडते, हे या मर्त्यलोकात तेवढेच वैगुण्य आहे, हे श्रीकृष्णाने चांगले जाणले असल्यामुळे, समाजरक्षण हाच धर्म असून सत्य हे साधन आहे, हे त्याने मनाशी निश्चित ठरविले होते. 'दैव आणि पुरुषप्रयत्न या दोहोंवर मिळून लोकहित अवलंबून आहे, हे प्राचीन महात्म्यांनी विचारपूर्वक ठरविले आहे.' (उद्योग ७९.४) हे तो धर्मराजाला नेहमी सांगत असे. मानवी जीवनाचे असे सम्यक् आकलन झालेले असल्यामुळे धर्मासाठी धर्म ही एकांतिक धर्मनिष्ठा कृष्ण त्याज्य समजत असे. रामयुगातही हा विचार उद्भूत झाला