पान:माझे चिंतन.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ९२ माझे चिंतन

होती. पण रामाचे उत्तर एक. 'मी पित्याची आज्ञा उल्लंघिण्यास असमर्थ आहे. हे रघुकुलाला शोभणार नाही. पित्राज्ञापालन हाच सनातन धर्म होय. पित्याने जी आज्ञा केली ती क्रोधामुळे किंवा विषयाधीनतेमुळे केलेली असली तरी धर्मनिष्ठ पुरुषाने ती पाळलीच पाहिजे,' (अध्याय २१- ५९) असे रामाचे धर्मतत्त्व होते; आणि त्याप्रमाणे तो वर्तत होता. या वर्तनामुळे अपरिमित हानी होईल हे त्याला दिसत होते. कैकेयी ही दशरथाला व कौसल्येला विष घालील अशी त्याला भीती वाटत होती. आपण गेल्यावर राज्यावर विपत्ती येईल हेही त्याच्या ध्यानी येत होते. तरी सुद्धा 'पित्याच्या आज्ञेचे उल्लंघन करणे हा अधर्म होय'- 'धर्म व अर्थ यांना सोडून केवळ कामवशतेमुळे केलेल्या आज्ञेचेही उल्लंघन करणे या अधर्माची मला भीती वाटते' असे तो म्हणाला; आणि पित्राज्ञापालन या श्रेष्ठ व सनातन धर्माचे आचरण त्याने केले.

समाजरक्षण हाच धर्म

 या ठिकाणी श्रीकृष्ण असता तर ? त्याने ही पित्राज्ञा कधीही पाळली नसती हे निश्चित होय. समाजरक्षण हा त्याचा धर्म होता. ती त्याची अंतिम निष्ठा होती. कोणत्याही कार्याची युक्तायुक्तता तो 'लोकसंग्रह' या निकषावरून ठरवीत असे. त्याची धर्माची, सत्याची, न्यायाची व्याख्या एकच होती. समाजाचे कल्याण हाच धर्म होय. धर्मनियम हे लोकांच्या प्रभवासाठी म्हणजे उत्कर्षासाठीच केलेले असतात, धर्म हे समाजनिरपेक्ष असे काही तत्त्व नव्हे, असे त्याचे मत होते. आपल्या काही प्रतिज्ञांचे अर्जुन स्तोम माजवू लागला तेव्हा श्रीकृष्णाने त्याला हे तत्त्व समजावून दिले. श्रुती हा धर्माचा आधार हे खरे; पण भूतांचा उत्कर्ष हेच ध्येय पुढे ठेवून श्रुतीत धर्माची व्याख्या केलेली असते. म्हणून धर्माधर्मनिर्णय तर्काने करावा लागतो, असा आपला अभिप्राय श्रीकृष्णाने दिलेला आहे. (कर्णपर्व ६९). रामाच्या ठायी श्रीकृष्ण असता तर त्याने आपल्या मृदू, सौम्य पण निश्चयात्मक वाणीने दशरथाला धर्मतत्त्व विशद करून सांगितले असते आणि कैकेयीला लोककल्याणासाठी कदाचित शासनही केले असते.

तारतम्य

 श्रीकृष्णाच्या चारित्र्याचा प्रधानगुण म्हणजे त्याचा हा धर्मविषयक दृष्टिकोण होय. तो अत्यंत मोठा व्यवहारपंडित होता. मानवी संसारातील शक्याशक्य-