पान:माझे चिंतन.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भगवान श्रीकृष्ण ९१ 

वृद्धिंगत झाले आहे त्या या कौस्तुभाचा तेजोविलास जितका जवळून न्याहाळावा तितका जास्त मनोरम वाटतो.

कुल व राष्ट्र

 भरतखंडाच्या इतिहासात श्रीरामचंद्र व श्रीकृष्ण हे दोन अवतारी पुरुष गणले गेले आहेत. त्यांची प्रत्यक्ष अवतारकार्ये कोणती हे त्यांच्या चरित्रांत वर्णिलेले आहे. या त्यांच्या चरित्रांवरून असे स्पष्ट दिसते की, या दोन पुरुषांनी धर्म म्हणून जी तत्त्वे डोळ्यांपुढे ठेविली होती ती एकमेकांपासून अगदी भिन्न अशी होती. मानवजातीच्या इतिहासक्रमात अनुक्रमाने येणाऱ्या दोन भिन्न कालखंडांची ती तत्त्वे होती. मानवसमाजाच्या संघटनेत कुटुंब हा पहिला घटक आहे. तो पहिला पेशी आहे. अशी अनेक कुटुंबे मिळून नंतर समाज होतो. या दोन अवस्थांत दोन भिन्न धर्मतत्त्वे प्रचलित असणे हे साहजिक आहे. श्रीरामचंद्र हा कुटुंब किंवा कुल या पहिल्या अवस्थेतला अवतार असून श्रीकृष्ण हा अशी अनेक कुले एकमेकांशी दृढपणे संलग्न झाल्यानंतर जो समाज निर्माण झाला त्या अवस्थेतला अवतार आहे. कुल ही रामाची अंतिम निष्ठा आहे. त्यामुळे पित्राज्ञापालन हा त्याचा सर्वश्रेष्ठ धर्म होता. समाज किंवा प्रजा यांच्या कल्याणाची त्याला चिंता नव्हती असे नाही; पण पित्याच्या आज्ञेचा अवमान करून ते साधावे अशी त्याची दृष्टी नव्हती. लोकसमूहात शासन निर्माण करण्याची इच्छा उद्भूत झाली की त्यात प्रथम शासनाचा एक लहान एकांक (युनिट) तयार होती अणि मग त्या एकांकात कोणाची तरी सत्ता अंतिम म्हणून मानावी लागते. कुल या एकांकात पिता ही अंतिम सत्ता सर्व जगात मानलेली होती, आणि त्यामुळे त्या अवस्थेत त्या पित्याची आज्ञा पाळणे हा सर्वश्रेष्ठ धर्म ठरत असे. रामचंद्राचे हेच तत्त्व होते. आपला पिता काममूढ झाला असून लंपटबुद्धीने तो आपणास वनवासात हाकून देत आहे, हे रामचंद्राला मान्य होते. गंगा ओलांडून एका वृक्षाच्या खाली विश्रांतीसाठी त्रिवर्ग बसले असताना रामचंद्राने मन मोकळे करून हे लक्ष्मगाला सांगितले; पण म्हणून त्याच्या आज्ञेचा अवमान करणे हे त्याला मान्य नव्हते. वनवासाला जाण्यापूर्वी लक्ष्नण नाना तऱ्हेने त्याला सांगत होता की, 'हा दशरथ पिता म्हणवून घेण्यास पात्र नाही. मी याला कैदेत टाकतो. त्याची पर्वा न करता तू राज्य हाती घे.' अशी परोपरीने लक्ष्मणाने विनवणी चालविली