पान:माझे चिंतन.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे






भगवान श्रीकृष्ण





कौस्तुभ
 महाभारताची थोरवी आज त्रिखंडातल्या विद्ववरांना व रसिकांना मान्य झालेली आहे. प्राक्कालीन भारतातील महाप्रज्ञावंत पुरुषांच्या अद्भुत प्रतिभेचा तो एक असामान्य असा विलास आहे याविषयी आता दुमत राहिलेले नाही. अनेक साहित्यगुणांनी संपन्न असल्यामुळेच या ग्रंथाला आजच्या जगात असे अलौकिक स्थान प्राप्त झाले आहे हे उघड आहे. या महाभारतात इतिहास आहे. काव्य आहे. तत्त्वज्ञान, धर्मप्रवचन आहे. स्वतः वेदव्यासांनीच म्हटल्याप्रमाणे हा ग्रंथ भगवान समुद्र किंवा हिमवान गिरी यांच्याप्रमाणे अनंत रत्नांनी समृद्ध आहे. आणि म्हणूनच त्याला अमरता प्राप्त झाली आहे. या अनंत रत्नांमध्ये श्रेष्ठकनिष्ठ भाव लावणे फार कठीण आहे हे खरे व याबद्दल फार मतभेद होतील ही खरे. तरी पण हा प्रयत्न करणे अगदी निष्फल होईल असे वाटत नाही. या अनंत रत्नांमध्ये भगवान श्रीकृष्णाचे चरित्र हे अगदी निस्तुल व अद्वितीय असे रत्न आहे, असे मला वाटते. हे चरित्र म्हणजे या रत्नमालेतील कौस्तुभ आहे. भारतातील सर्व घटना, सर्व प्रसंग, त्यातील धर्मवेत्त्यांनी केलेली प्रवचने, सांगितलेली तत्त्वज्ञाने या सर्वोवर या महापुरुषाच्या कर्तृत्वाची, विचारांची व चारित्र्याची छाप पडलेली सष्ट दिसून येते. शरीरातील प्रत्येक अणू, रक्तबिंदू व पेशी यांशी आत्मतत्त्वाचा संबंध असतो आणि त्या आत्मतत्त्वामुळेच त्या शरीराला एकता, सांगता व पृथगात्मता हे गुण प्राप्त झालेले असतात. महाभारतांतील अनंत रत्नांची ज्याच्यामुळे एक माला बनली आहे व ज्यामुळे तिचे सौंदर्य