पान:माझे चिंतन.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ८८ माझे चिंतन

आहे. या घटनेच्या बाराच वर्षे आधी या राष्ट्रांचे अहिनकुलमंबंध होते. जर्मनीने फ्रान्स, नेदरलँड्स, बेल्जम या देशांवरून नांगर फिरविला होता. फ्रान्स पडतो हे पाहून त्याचे लचके तोडण्यासाठी जर्मनीच्या बाजूने इटली युद्धात उतरला होता. जर्मनी व इटली या दोन दण्डसत्ता होत्या तर इतर चार देश लोकायत्त होते. शिवाय या देशांतील हे वैर आजकालचे नव्हते. १८७० व १९१४ साली जर्मनीने फ्रान्स, बेल्जम असेच बेचिराख केले होते. उलट नेपोलियनच्या काळी फ्रान्सने जर्मनीचा व इटलीचा विध्वंस केला होता. म्हणजे ही वैरे पिढ्यान् पिढ्यांची होती. भाषा निराळ्या, परंपरा निराळ्या, धर्मपंथ निराळे; फ्रान्स कॅथालिक तर जर्मनी प्रोटेस्टंट- आणि हे शतकाशतकांचे हाडवैर ! अशा स्थितीत ही राष्ट्रे एका संघटनेत सामील होतील व परस्परांचे आर्थिक हितसंबंध एक करू पाहतील असे कोणी १९५७ च्या आधी म्हटले असते तर तो भ्रांतिष्ट व स्वप्नाळू ठरला असता. पण आज ही घटना घडली आहे. आणि पंधरा वर्षे ती टिकली आहे. आणि प्रत्येक देशाचा व्यापार दुपटीने वाढून लोकांना कल्पनातीत फायदा झाला असल्यामुळे ही कम्युनिटी आता अभंग झाली असे लोकांना वाटू लागले आहे.
 ही संघटना घडविणाऱ्यांनी मोठी मुत्सद्देगिरी केली आहे. या सर्व राष्ट्रांच्या राजकीय ऐक्याचा त्यांनी विचार प्रथम केलाच नाही; कारण ते घडल्यावरही व्यापार, नद्यांचे पाणी, राहणीचे मान, यांवरून वैषम्य निर्माण होते. म्हणून प्रथम त्यांनी परस्परांच्या सरहद्दीवरची जकातनाकी काढून टाकली. आणि या सहा देशांत खुला व्यापार सुरू केला. त्यामुळे सर्वांच्याच व्यापाराला बहर आला व समृद्धीचा लाभ सर्वांनाच झाला. यामुळे आता राजकीय ऐक्याची स्वप्ने या देशांना दिसू लागली आहेत. हे उद्दिष्ट पहिल्यापासूनच आपल्या डोळ्यांसमोर आहे, असे जर्मनीचे माजी चॅन्सेलर ऑडेनार यांनी एका भाषणात सांगितले; पण त्याची वाच्यता प्रथम कोणीच केली नव्हती. आता पहिल्या प्रयोगात यश आल्यामुळे स्वप्न साकार करण्याची उमेद कम्युनिटीला वाटू लागली आहे. अणुशक्ति- संवर्धनाच्या बाबतीत आजच या सहा देशांनी सामायिक युरोपी पार्लमेंट, सामयिक मंत्रिसमिती व सामायिक न्यायालय स्थापिले आहे आणि त्यांचा कारभार व्यवस्थित चालू असल्यामुळेच कम्युनिटीचे एक स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र घडवावे अशी घटकराष्ट्रांत आकांक्षा उदित झाली आहे.
 युद्ध अटळ आहे काय ? या प्रश्नाचे उत्तर आपण शोधीत होतो. सामान्यतः