पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[५१


आणि अेखाद्या घासलेल्या तरवारीप्रमाणें त्यांची मेंदूची तरतरी चकचक चकाकणारी आहे !

* * *

 " आणि म्हणूनच साहित्यसंमेलनांतील दोन तात्यासाहेबांचा संयोग म्हणजे प्राचीन युग आणि अर्वाचीन युग ह्यांचा संयोग आहे ! ' कृत'युग जर 'कलि'युगाला भेटावयाला आलें, किंवा अश्वत्थामा जर ब्रिटिश पलटणींत अुभा राहिला, तर ज्या प्रकारचा संयोग दिसेल तशा प्रकारचा संयोग ह्या दोन तात्यासाहेबांच्या योगाने यंदाच्या साहित्यसंमेलनांत दिसणार आहे ! कारण श्रीपाद कृष्ण म्हणजे प्राचीन जग आणि नरसोपंत केळकर म्हणजे वर्तमानपत्राचा ताजा अंक ! 'मौज' पत्राच्या पहिल्या पानावर वेद छापावेत किंवा वेदाच्या अेखाद्या अध्यायांत बालगन्धर्वाचें "लेटेस्ट " पद आढळावें त्यांतीलच हा संयोग होय ! यंदाच्या संमेलनाला निदान ह्या अेका गोष्टीने जरी अपूर्वता आली तरी त्यांत आश्चर्य नाही.

* * *

 " दोघां तात्यासाहेबांत हा जसा अेक मोठा फरक आहे तसा आणखीहि अेक फरक आहे. दोघेहि तात्यासाहेब रसिक आहेत, प्रेमळ आहेत, रंगदार आहेत, रंगेल आहेत - तथापि अेकाच्या स्वभावांत भयंकर लाजाळूपणा आहे आणि दुसऱ्याच्या स्वभावांत तितकाच ढकलबाजपणा (Pushingness) आहे ! अेकाच्या पुढे पक्वान्नांचे ताट वाढलेलें असलें तरी दुसरे काय म्हणतील ह्या भीतीने ते जपून खातील. दुसरे खुलेपणाने पक्वान्नावर हात मारतील आणि पुनः वर असें म्हणतील की " काय हो, जिलब्याच जिलब्या झाल्यामुळे तोंडाला कशीं मिठी वसलेली आहे ! ह्यावेळीं जर चार खुसखुशीत भजी असती तर काय बहार झाली असती !

* * *

 " किंबहुना तात्यासाहेब केळकर यांच्या लोकप्रियतेचें हेंच बीज आहे! ते कोठेहि गेले, तरी मनमोकळेपणाने घरच्यासारखे वागतील आणि लहानापासून थोरापर्यंत आवडणाऱ्या प्रत्येक विषयांत लक्ष घालतील. तात्यासाहेब कोल्हटकर यांचें तसें नाही ! त्यांच्याभोवती नेमकी ३|४ माणसेंच आहेत