पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
४२]

[माझा जन्मभरचा


“ पण केळकर यांचा खरा गौरव १९२१ सालापासून जीं ५/६ वर्षें मोठ्या धामधुमीचीं गेलीं त्यांतील मजकुराने होतो. आतापर्यंत स्वतंत्र पुढारीपण असें त्यांनी केलें नव्हतें. टिळक असतांना टिळकच तें करीत, व ते तुरुंगांत असतांना तें करतां येणें कोणासहि अशक्यच होतें. टिळक यांच्यानंतर महात्मा गांधी पुढारी झाले; व आपल्या मतस्वातंत्र्याचा जो हक्क केळकर हे खुद्द टिळकांच्या संगतींत गाजवीत असत, तोच त्यांनी गांधींच्या संगतींत गाजविला. फरक अितकाच की, त्यांच्या म्हणण्याचा टिळक यांनी आपल्या म्हणण्यांत समावेश करून घेअून व त्यांना आपलें म्हणणें पटवून देअून त्यांचा संग्रहच केला. पण महात्मा गांधींच्या बाबतींत हा प्रकार विपरीत झाला. पण त्याने अेक गोष्ट पुनः अेकदा सिद्ध झाली. ती ही की, केसरीचे संपादक स्वतंत्र विचार करतात अितकेंच नव्हे, चांगल्या चांगल्या बुद्धिमंतांशी बौद्धिक झुंज करून त्यांना रेटीत रेटीत नेअून 'मला आपलें असें वाटतें' ह्या स्वयंभू प्रमाणाशिवाय दुसरें कोणतेंहि प्रमाण शिल्लक अुरूं देत नाहीत. १९०९ ते १९१४ ह्या काळांत ज्याप्रमाणें त्यांची ज्ञानलालसा, वाङमयभक्ति आणि विचारांतील आवरशक्ति हीं स्पष्ट झालीं, त्याप्रमाणेंच १९२१ ते २६-२७ पर्यंतच्या काळांत त्यांची मतस्वतंत्रता, सामान्य विधानांत गुप्त रूपाने वावरत असलेले हेत्वाभास अुघडकीस आणण्याची कुशलता, माणसाच्या मनाची सूक्ष्म ओळख, व मनस्वी पुढा-याच्या योग्यतेचा मान करूनहि त्याचें विचारवैकल्य त्यास दाखवून देण्यास लागणारा आत्मविश्वास हे गुण अत्यंत ठळकपणाने नजरेस आले. बुद्धिदृष्टया म. गांधींचें धोरण चूक आहे असें दिसूं लागतांच त्यांच्या लोकप्रियतेचा मुलाहिजा न बाळगतां आपलें मत ठासून सांगण्याच्या कामीं जी निर्भयता त्यांनी दाखविली ती केसरीच्या कुलव्रताला साजेशीच होती; आणि सतत पांचसहा वर्षें बौद्धिक झुंज करून लोकमान्यांचें प्रतिसहकाराचें तत्त्व पुनरपि प्रस्थापित करण्याच्या बाबतींत त्यांनी दाखविलेली अीर्षा व चिकाटी हीं तर संपादकीय अितिहासांत अितर क्वचितच पाहावयास सापडतील. वाद करतांनासुद्धा अुगाच धुरोळा अुठविण्याची गोरजपद्धतिहि त्यांनी कधी अवलंबिली नाही. हें वैभव त्यांनी केसरीस दिलें. सामान्य विधानांत खोल शिरून त्याचे तपशील न्याहाळावयास बुद्धीला शीण पडतो,