Jump to content

पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[ ११७


करून खावयाचा वाढावयाचा, आणि भांडीं धुअून हात झाडून मोकळें व्हावयाचें. या दोनहि प्रकारचे लोक मला मान्य नाहीत. मला विद्वानाचा तो प्रकार आवडतो की जो स्वतः सुविद्य व बहुश्रुत असतो, व त्या ज्ञानाचा अितरांनाहि लेखनप्रवचनद्वारा अुपयोग करून देतो. मी स्वतः या प्रकाराचीच आवड धरली. मी वर्तमानपत्रकार झालों नसतों तरी ग्रंथकार झालों असतों. पण मी वर्तमानपत्रकार झाल्याने मला भ्रमरवृत्ति व मधुमक्षिकावृत्ति दोन्हीचा उपयोग करतां आला.
 ( ११० ) केसरी व मराठा या दोन्ही वर्तमानपत्रांत प्रचलित राजकीय विषयांवर तर मला नित्य लेख लिहावे लागतच. पण मी मनाने वैचित्र्य व विविधता यांचा भोक्ता असल्याकारणाने, आणि माझ्या विस्तृत वाचनांत अनेक विषय सहजच सुचत असल्याकारणाने, मी प्रचलित नाहीत अशाहि विषयांना, लहानशाहि निमित्ताने, प्रचलितपणाचें स्वरूप देअून निबंधवजा अिंग्रजी मराठी लेख लिहीत असें. राजकारणाचा व्याप १९०५ पर्यंत या देशांत सर्वत्रच बेताचा होता. १९०५ ते १९०९ या सालांत त्यांना पुष्कळच 'भर आला. पुढे १९१४ सालीं महायुद्ध सुरू झालें. लो. टिळक मंडालेहून परत आले, तेव्हापासून राजकारण हाच प्रधान विषय वर्तमानपत्रांना लिहिण्याला झाला. आणि तो यापुढे केव्हाहि गौण होणार नाहीं. मुख्यच राहील. पण मला सांगावयाचें तें हें की १९१० ते १९१५ पर्यंत मी खुद्द केसरींत निबंधलेखनाची हौस अितकी पुरवून घेतली की, चित्रशाळेला त्यांतील निवडक निबंधांचा मिळून सुमारे सहाशें पानांचा ग्रंथच काढता आला. मी निश्चितपणें म्हणूं शकतों कीं, ठरीव चाकोरीबाहेर जाऊन अवांतर विषयांवर मी जितके लेख केसरींत लिहिले तितके दुसऱ्या कोणाहि संपादकाने लिहिले नाहीत.
 (१११) हें तर झालेंच. पण वर्तमानपत्रांतून जी भूक भागण्यासारखी नव्हती ती मी आणखी अनेक स्वतंत्र ग्रंथ लिहून भागविली आहे. आणि माझ्या ग्रंथांतहि विषयांचें वैचित्र्य व विविधता हीं अुघड दिसून येतात. आयर्लंडचा अतिहास, तिरंगी नवमतवाद, संस्कृत विद्येचें पुनरुज्जीवन हे ग्रंथविषय अेकवेळ केसरींत लेखमालेच्या रूपाने लिहिले गेले होते !