Jump to content

पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[१०३


वगैरे महाराष्ट्रीय लोक हिंदी भाषा लिहिण्यांत अितके निष्णात आहेत की त्यांचा हात हिंदी लेखकहि धरणार नाहींत. पण हिंदी मातृभाषा असणारे पण चांगले मराठी लेखक किती झाले ? माझें गुजरातीचें ज्ञान हिंदीपेक्षाहि पुष्कळच कमी आहे. ती भाषाच महाराष्ट्रांत हिंदीपेक्षा कमी प्रसृत आहे. यामुळे महाराष्ट्रियांना हिंदीपेक्षा गुजराती कमी येतें. बडोदें प्रांत गुजरात वगैरेमध्ये राहाणाऱ्या महाराष्ट्रियांची गोष्ट मात्र वेगळी. तेथे काका कालेलकरांसारख्या गृहस्थांनी गुजराती लेखक म्हणून जसें नांव केलें तसें कोणत्याहि गुजराती मनुष्याने मराठी लेखक म्हणून नांव केलेलें नाही. कानडी मात्र मला दहापांच वाक्यांअितकेहि येत नाही. याचें कारण कानडी कानावरून जात नाही असें नाही; तर ती भाषाच अवघड व संस्कृतापासून अगदी सुटून आहे. अुलट अुच्च प्रतीचें हिंदी, गुजराती, बंगाली घेतलें तर त्यांतले साठ पाअुणशें टक्के शब्द जवळ जवळ सारखे म्हणजे संस्कृताशीं संबंध असलेले, असेच आढळतील.
 (९२) मला संस्कृत भाषेची व वाङमयाची फार आवड आहे. 'संस्कृत विद्येचें पुनरुज्जीवन' या माझ्या निबंधांत ती चांगलीच दिसून येते. हायस्कुलांत असतां मी अमरकोश ( कांड १) पाठ केला होता. त्याचप्रमाणें रूपावली व समासचक्र घोकलें होतें. रघुवंशाचे दोनतीन सर्ग वाचले होते. डॉ. भांडारकर यांच्या संस्कृत शालोपयोगी पुस्तकांपलीकडे व्याकरणांत माझी मजल गेली नव्हती. पण आपटे यांच्या ग्रंथांतील अुतारे सुभाषित-संग्रह अित्यादिकांचें वाचन माझें मधून मधून होत असे. तथापि संस्कृत भाषेचा पद्धतशीर अभ्यास असा नाहीच म्हटलें तरी चालेल. कॉलेज सोडल्यानंतर मी संस्कृताचा ग्रंथ क्वचितच वाचला असेल. नाही म्हणावयाला, केवळ विनोदस्थळें हुडकून तीं 'सुभाषित व विनोद' या विषयावरील पूर्वींच्या ग्रंथांत अुदाहरणादाखल घालण्याकरिता, मी अनेक संस्कृत काव्य-नाटकें चाळलीं. पण तेव्हाहि त्याचा अभ्यास असा केला नाही. मग स्वतः संस्कृत लेख मी कोठून लिहिणार? आणि त्यांना संधि तरी कोठें होती ? तथापि संधि येतांच माझी संस्कृताची आवड जागृत होअी. त्याप्रमाणें प्रथम १९०६ सालीं, किर्लोस्कर नाटक गृहावर अखादें अुचित वचन पाहिजे होतें म्हणून मी खालील श्लोक मुद्दाम तयार करून दिला -