पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
६२
 

फार मदत झाली, म्हणून त्याने स्वतः राया ही पदवी स्वीकारली त्यावेळी त्यांच्या प्रमुखांना महारथी ही पदवी दिली व त्यांच्याशी सोयरीकही केली. त्याने एकंदर इ. पू. २३५ ते इ. पू. २१३ असे तेवीस वर्षे राज्य केले. त्याच्या राज्याचा विस्तार हा शिवछत्रपतींच्या प्रारंभीच्या विस्ताराइतका अल्प, प्रतिष्ठानच्या आसपासच्या परिसरापुरताच असणार हे उघड आहे.

साम्राज्य
 सिमुकानंतर त्याचा भाऊ कान्ह अथवा कृष्ण हा गादीवर आला. त्याने आपल्या अठरा वर्षांच्या कारकीर्दीत राज्यविस्ताराचेच धोरण पुढे चालवून नाशिकपर्यंतचा प्रदेश जिंकला. त्याच्यामागून सिमुकाचा पुत्र सिरी सातकणी - श्री सातकर्णी हा सत्तारूढ झाला. सातवाहन कुलात सम्राटपद प्रात करून घेणारा हा पहिला महाराजा होय. या वेळी उत्तरेत राजसत्ता ढिली झाली होती. डेमिट्रियस या बॅक्ट्रियाच्या ग्रीक राजाने अयोध्येपर्यंत आपली ठाणी वसविली होती. आणि सर्वत्र बौद्धधर्मातील अहिंसा तत्त्व प्रबळ झालेले असल्यामुळे त्याला कोणीच प्रतिकार करीत नव्हता. मगधसम्राट बौद्धधर्मनिष्ठ असल्यामुळे व त्यांनाही शस्त्रविजयापेक्षा धम्मविजयच श्रेष्ठ वाटत असल्यामुळे सर्व उत्तर भारत निर्वीर झाला होता. आणि महाराष्ट्रात श्री सातकर्णी, कलिंगात खारवेल व मगधात पुष्यमित्र हे कर्तेपुरुष निर्माण झाले नसते तर सर्व भारत यवनांनी - ग्रीकांनी आक्रमिला असता. या सर्वात सातकर्णीने आघाडी मारून उत्तरेत चाल केली व पश्चिम माळवा, अनूप - ( नर्मदेचे खोरे) आणि विदर्भ आपल्या साम्राज्यात समाविष्ट करून टाकले. हे प्रदेश त्याने घेतले ते मौर्यसाम्राज्यातून. पण यावेळी मौर्य अगदी निष्प्रभ झाले होते. तेव्हा अयोध्येपर्यंत आलेल्या यवनांनी सहज गिळंकृत केले असते. सातकर्णीने ते घेतले म्हणूनच वाचले.

कलिंगराज खारवेल
 या वेळी खारवेल हा एक अत्यंत प्रबळ राजा कलिंगाधिपती झाला होता. अशोकाच्या मृत्यूनंतर थोड्याच दिवसांनी चेदीवंशातील महामेघवाहन या पुरुषाने मौर्य साम्राज्याचे जू झुगारून देऊन कलिंग प्रदेश स्वतंत्र केला होता. खारखेल हा त्याचाच पुत्र किंवा नातू होय. भुवनेश्वराजवळील उदयगिरीवर हाथीगुंफानामक लेण्यात याच्या पराक्रमाचा दीर्घ शिलालेख आहे. त्यावरून असे दिसते की याने मगध साम्राज्यावर तीन वेळा स्वारी केली होती आणि एका स्वारीत मौर्यसम्राटाला पायाशी लोळवून तेथून अपार लूट कलिंगाला नेली होती. दुसऱ्या स्वारीचे कारण डेमिट्रियस हे होते. मौर्य- सम्राट बृहद्रथ हा त्याचा मुळीच प्रतिकार करीना. तेव्हा तो पाटलीपुत्रावर चाल करून येणार असा रंग दिसू लागला. म्हणून खारवेलानेच आधी चढाई केली. काही पंडितांचे मत असे की या स्वारीत त्याने डेमिट्रियसचा पराभव करून त्याला सिंधू-