पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/९०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
६३
मरहट्ट सम्राट सातवाहन
 

पार पिटाळून लावले. दुसरे मत असे की डेमिट्रियसच्या स्वतःच्या बॅक्ट्रियाच्या राज्यातच शुक्रेडायटीम या प्रतापी पुरुषाने बंड केल्यामुळे त्याला घाईने परत जावे लागले. आणि खारवेलाच्या भीतीने तो पळून गेला असे श्रेय खारवेलाला उगीचच मिळाले. हा राजकीय पट पाहताना आपण एवढेच ध्यानात घ्यावयाचे की अशोकाने अहिंसा व धम्मविजय यांच्यापायी, चंद्रगुप्त मौर्याने उभारलेली समर्थ व कार्यक्षम राज्ययंत्रणा ढिली केली आणि लोकांतही बौद्धधर्माचा प्रसार केला. त्यामुळे मौर्यसाम्राज्य-राजे - आणि लोकही दुबळे होऊन गेले होते, आणि ते सर्वांचे भक्ष्य बनले होते. प्रतिकार असा तेथे कोणी करीतच नव्हता. त्यामुळे वायव्येकडून येणाऱ्या यवन आक्रमकांना पाटलीपुत्रापर्यंत सहज घुसता आले. पण त्याच वेळी सातकर्णी व खारवेल हे उदयास आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

महाराष्ट्रावर स्वारी
 खारवेल हा मोठा प्रतापी व महत्त्वाकांक्षी पुरुष होता. मगधाची लूट केल्यानंतर त्याने आपली दृष्टी सातवाहन साम्राज्याकडे वळविली आणि मूषिकनगरापर्यंत एक प्रचंड सेना धाडली. हे नगर कोणाच्या मते वाईनगंगेच्या तर कोणाच्या मते कृष्णेच्या तीरी आहे. याच वेळी खारवेलाला फार मोठा जय मिळाला असे हाथीगुंफेच्या लेखात वर्णन आहे. पण पंडितांच्या मते तसे काही झाल्याचे दिसत नाही. पुढील वर्षी वऱ्हाड, खानदेश व अहमदनगर या प्रदेशांवर खारवेलाने स्वारी केली, तेव्हा मात्र त्यास मोठा जय मिळाला हे सर्वमान्य आहे. खारवेल हा जैनधर्मी होता. पण एकतर तो धर्मसहिष्णू होता आणि दुसरे म्हणजे त्या धर्मातील अहिंसा तत्त्व त्याने राजकारणापासून दूर ठेविले होते; म्हणूनच त्याला एवढे पराक्रम करून यवन आक्रमणाला पायबंद घालता आला.

अश्वमेधकर्ता
 श्री सातकर्णीच्या साम्राज्यावर खारवेलाचे दोनदा आक्रमण झाले तरी त्याने ते तत्काळ मोडून काढले, असे दिसते. कारण त्याने आपल्या अकरा वर्षांच्या लहानशा कारकीदींत ( इ. पू. १९४ ते इ. पू. १८५ ) दोनदा अश्वमेध यज्ञ केला आणि एकदा राजसूय यज्ञ केला. हे यज्ञ व अग्न्याधेय, अन्वारंभणीय, गवामयन, आप्तोर्याम, अंगिरसामयन, छंदोग - पवमान, अतिरात्र, दशरात्र, त्रयोदशरात्र इ. त्याने जे इतर अनेक यज्ञ केले, त्यांवरून वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्धार करूनच त्याने साम्राज्य–विस्तार केला हे उघड आहे. दीर्घकालपर्यंत महाराष्ट्रात बौद्धवर्चस्व प्रस्थापित झाले होते. सातवाहनांनी ते नष्ट करून विजीगिषू, विश्वविजयी, साम्राज्यकांक्षी वैदिक धर्माचा पुनरुद्धार केला हे त्यांचे फार मोठे कार्य होय. श्री सातकर्णी याची राणी नायनिका अथवा नागनिका हिने जुन्नरजवळील नाणेघाटात जो मोठा लेख कोरविला