पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
६१
मरहट्ट सम्राट सातवाहन
 

असाच उल्लेख केला आहे. शालिवाहन हे नाव तिच्याशी जोडले गेले ते इ. स. एक हजारनंतर ! पण शालिवाहन - सातवाहन - या नावाशी शककालगणना संलग्न झाली आहे व धर्मकृत्यांतही ती मानलेली आहे. तेव्हा बऱ्याच उत्तरकाळी मूळ शकराजांनी स्थापिलेल्या या गणनेला कोणीतरी शालिवाहनाचे नाव देऊन ती पावन करून घेतली असली पाहिजे, असे म्हणावे लागते. म. म. मिराशी, डॉ. के. गोपाळाचारी यांचे असेच मत आहे.

स्वराज्यस्थापना
 वर सांगितकेच आहे की अशोकाच्या मृत्युच्या सुमारास सातवाहननामक पुरुषाने महाराष्ट्रातील प्रतिष्ठान या नगरीत सातवाहनसत्तेची स्थापना केली. मौर्य साम्राज्य दक्षिणेस म्हैसूरपर्यंत पसरलेले होते. अर्थात महाराष्ट्राचा त्यात अंतर्भाव असलाच पाहिजे असे काही पंडितांना वाटते. अपरान्त म्हणजे उत्तर कोकण यावर मोर्यसत्ता होती याबद्दल वाद नाही. पण अशोकाचे शिलालेख महाराष्ट्रात नाहीत यावरून त्याची सत्ता महाराष्ट्रावर नसावी, असे डॉ. केतकर म्हणतात. मात्र त्यांचे धर्मप्रसारक महाराष्ट्रात पोचले होते हे त्यांना मान्य आहे. (प्राचीन महाराष्ट्र, भाग १ ला, प्रकरण ४४ वे.) पण याविषयी निश्चित असे काही सांगणे कठीण आहे. सातवाहन हे मौर्याचे मांडलीक होते, असेही एक मत आहे. पुराणात त्यांना कोठे आंध्र म्हटले आहे, कोठे आंध्रभृत्यही म्हटले आहे. आंध्रभृत्य हा समास कर्मधारय करून तो आंध्र हेच भृत्य, असा काही पंडित सोडवितात. आणि सातवाहन हे मूळचे आंध्र होते व ते मौर्यांचे भृत्य होते म्हणून त्यांना आंध्रभृत्य म्हटले असावे, असे अनुमान करतात; पण यालाही निश्चित असा पुरावा काही नाही. सातवाहन या राजाने अशोकाच्या अखेरीच्या काळात आपले स्वतंत्र राज्य महाराष्ट्रात स्थापन केले एवढेच. त्याची जी नाणी अलीकडे सापडली आहेत त्यांच्या आधारे, आपणास आज म्हणता येते. हे राज्य स्थापिताना त्याला मौर्यसत्तेशी लढावे लागले असा कोठेही उल्लेख नाही. असा काही लढा झाला नाही यावरून मौर्यांचे साम्राज्य महाराष्ट्रात नसावे किंवा असल्यास या वेळी ती सत्ता अगदी दुर्बळ झाली असावी असे अनुमान करावे लागते.
 मूळ संस्थापक श्री सातवाहन याचा पुराणात किंवा कोणत्याही शिलालेखात उल्लेख नसल्यामुळे त्याच्याविषयी अधिक काहीच माहिती उपलब्ध नाही. १९४५ साली त्याची नाणी सापडली तोपर्यंत त्याच्या अस्तित्वाचीही कोणास माहिती नव्हती. त्या नाण्यांमुळे तो मूळ संस्थापक होता हे कळले हेच विशेष होय. पुराणांनी व शिलालेखांनी उल्लेखिलेल्या या वंशातील पहिला राजा म्हणजे सिमुक सातवाहन हा होय. नाणेघाटातील कोरीव लेखात त्याची भग्नप्रतिमाही आहे. तिच्याखाली 'राया सिमुक सातवाहनो सिरिमातो' असा त्याचा निर्देश आहे. मौयसत्ता ज्या कोणत्या रूपात होती ती नष्ट करून त्याने स्वराज्याची स्थापना केली. त्या वेळी त्याला रथिक व भोज या जमातींची