पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५९
मरहट्ट सम्राट सातवाहन
 

बी. सी. लॉ यांनी आपल्या लेखात सांगितले आहे. पृ. ३०४.) मनूने शकयवनपल्हवपारद यांना संस्कारलोपामुळे शूद्रत्व पावलेले क्षत्रिय असे म्हटले आहे. गौतमीपुत्राने शकांचा निःपात केला. तेव्हा त्यांना उद्देशूनही ' खतिय' हा शब्द वापरलेला असण्याचा संभव आहे. या सर्वावरून सातवाहन हे क्षत्रिय असावे असे मानण्याकडे कल होतो. तरी हा प्रश्न वादग्रस्त असून त्याचा समाधानकारक निर्णय लावता येत नाही हे खरे आहे. पण माझ्या दृष्टीने त्याला फारसे महत्त्व नाही. जुन्या परंपरेप्रमाणे व पुराणांन्वये नंदवंश व मौर्यवंश यांचे संस्थापकही शूद्र होते. प्राचीन काळातले अनेक ऋषिमुनी अगदी हीनवंशीय होते. तेव्हा सातवाहन हे शूद्र होते असे ठरले तर त्यात खेदजनक असे काही नसून, हीनकुलीन पुरुषही इतक्या थोर पदवीला त्या काळात जाऊ शकत असत, त्यांच्या कर्तृत्वाला द्विजांइतकाच तेव्हा अवसर व मान होता, असे त्यावरून ठरत असल्यामुळे त्या काळच्या समाजरचनेला ते भूषणावह होते असेच मानावयास पाहिजे.
 मेवाडच्या गोहिल किंवा गोहिलोट वंशातील राजांचे जे शिलालेख आता उपलब्ध झाले आहेत त्यांवरून प्राचीन काळच्या घराण्यांचे ब्राह्मणत्व वा क्षत्रियत्व निश्चित करणे किती अवघड आहे व त्यामुळेच व्यर्थ आहे हे दिसून येते. शक्तिकुमार या गोहिलोटवंशीय राजाचा इ. स. ९७७ मधला शिलालेख ऐतपूर येथे सापडला आहे. त्यात म्हटले आहे की या वंशाचा मूळपुरुष गुहदत्त हा विप्रकुलानंदन महीदेव ( ब्राह्मण ) होता. चितोडचा इ. स. १२७४ चा लेख सांगतो की बाप्पारावळ हा विप्र होता. अचलेश्वरचा १२८५ चा लेख म्हणतो की बाप्पाने ब्रह्मतेज टाकून क्षात्रतेज स्वीकारले. चितोडच्या १२७४ च्या लेखात राजा अंबाप्रसाद याचे वर्णन आहे की तो भृगुपती परशुराम याप्रमाणे महातेजस्वी असून क्षत्रसंहारकारी होता. हा क्षत्रिय राजा असून तो क्षत्रसंहारकारी होता या म्हणण्याचा अर्थ काय ? पण म्हणून त्याला व त्याच्या घराण्याला ब्राह्मण म्हणावे तर अनेक लेखांत त्यांना क्षत्रियही म्हटले आहे. अंबाप्रसादाचा एक पूर्वज नरवाहन याला क्षत्रक्षेत्र म्हटले आहे. या घराण्याच्या सोयरिकी राष्ट्रकूट, चाहमान, परमार यांशी होत असत. आश्चर्य असे की प्रतीहार, चाहमान, परमार या कुळांनीही आपण ब्राह्मण असल्याचा दावा केलेला काही लेखांत आढळतो. इ. स. ८३७ चा जोधपूर येथील प्रतीहार वौक याचा लेख, आणि इ. स. ११६९ चा बिजोलिया येथील सोमेश्वर चाहमानाचा लेख याची साक्ष देतील. ( जी सी. रायचौधरी, गुहिलोट ऑरिजिन्स, देवदत्त भांडारकर व्हॉल्यूम, पृ. ३११–१६.)

मातृवंशपद्धती ?
 सातवाहन घराण्यात मातृवंशपद्धती होती, मातृसत्ताक कुटुंबपद्धती होती, असे एक मत आहे. डॉ. केतकर व इतिहासाचार्य राजवाडे या मताचे पुरस्कर्ते आहेत. या घराण्यात गौतमीपुत्र सातकर्णी, वसिष्ठीपुत्र पुलुमायी अशी मातेचा निर्देश करणारी