पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
५८
 

इ. स. पूर्व २३५ या वर्षापर्यंत जावे लागते. जुन्नर जवळील नाणेघाटात सातवाहनांचे जे शिलालेख उपलब्ध झाले आहेत ते त्यांतील लिपीवरून (अक्षरांच्या ठेवणीवरून ) इ. स. पूर्व २०० ते २५० या काळातील असले पाहिजेत असे व्यूलर या पंडिताचे मत आहे. आणि बहुतेक संशोधकांना ते मान्य आहे, असे डॉ. केतकर म्हणतात. ( प्राचीन महाराष्ट्र, भाग १ ला पृ. ४०८ व ४०९ ) वर उल्लेखिलेल्या 'काँप्रिहेनसिव्ह हिस्टरी ऑफ इंडिया' या ग्रंथात डॉ. जे. एन. बॅनर्जी यांनी 'उत्तर व पश्चिम भारतातील क्षत्रपसत्ता' हे प्रकरण लिहिले असून त्यात त्यांनी डॉ. के. गोपळाचारी यांच्याच मताला पुष्टी दिली आहे. सातवाहनसत्तेच्या अखेरीविषयी फारसे मतभेद नाहीत. तेव्हा इ. स. पूर्व २३५ ते इ. स. २२५ हा सातवाहन राजवंशाचा सत्ताकाळ होय, हे डॉ. के. गोपाळाचारी यांचे मत मान्य होईल असे वाटते. मूळ कुळपुरुष सातवाहन हा अर्थातच इ. पू. २३५ पूर्वीचा होय.

ब्राह्मण-क्षत्रिय ?
 सातवाहन हे राजे वर्णाने ब्राह्मण होते की क्षत्रिय होते की शूद्र होते, हा प्रश्न बराच वादग्रस्त आहे. दंतकथा व पुराणे याअन्वये, मूळ सातवाहन हा ब्राह्मण स्त्री व नागपुरुष यांच्यापासून झाला, असे आहे. पण नाशिक येथील गौतमी बलश्री ( महाराज गौतमीपुत्र सातकर्णी याची माता ) हिने कोरविलेल्या लेखात आपल्या पुत्राचा 'एक ब्राह्मण', 'क्षत्रियदर्पमानमर्दन' असा गौरव केला आहे. 'एक बाह्मण' 'खतियदपमानमदन' असे मूळ शब्द आहेत. त्याचप्रमाणे तिने स्वतःला ' राजर्षि- वधू' असे म्हणविले आहे. यांवरून दंतकथा अगदीच त्याज्य होत, यात शंका नाही. पण वरील पदव्यांवरून निरनिराळे वाद निर्माण होतात, हेही खरे आहे. 'एक बह्मण' याचा ' असामान्य ब्राह्मण' असा सेनार्ट याने अर्थ केला आहे व 'ब्राह्मण या नावाला एकमेव योग्य ' असा बुल्हरने केला आहे. डॉ. भांडारकर 'ब्राह्मणांचा एकमेव प्रति- पालक' असा अर्थ घेतात. तो जास्त संयुक्तिक वाटतो. गौतम बलश्री स्वतःला राजर्षि- वधू म्हणविते. यावरून त्या घराण्याचे क्षत्रियत्वच सिद्ध होते. म्हणून डॉ. भांडारकरांचा अर्थ ग्राह्य वाटतो. पण ' खतिय-दप - मान-मदन' अशीही गौतमीपुत्राला पदवी आहे. ती वरील अनुमानाच्या विरुद्ध जाते. पण तेथे ' खतिय' याचा अर्थ सर्व क्षत्रिय राजे असा घेण्याचे कारण नाही. क्षत्रिय ही एक त्या काळी स्वतंत्र जमात असू शकेल. त्या काळी शूद्र हेही एका वर्णाचे नाव नसून जमातीचे नाव असल्याचे उल्लेख आहेत. डॉ. जयस्वाल यांच्या मते, येथे खतिय हे एका जमातीचे नाव मानणं युक्त आहे. सध्या खत्री नावाची जमात मुंबई प्रांतात व अन्यत्रही आहे. डॉ. कुमारी भ्रमर धोप यांनी 'दि कास्ट ऑफ दि सातवाहन रूलर्स आफ दि डेक्कन' या आपल्या लेखात वरील विवेचन करून, सातवाहन क्षत्रिय होते, असे अनुमान काढले आहे. ( इंडियन कल्चर-ऑक्टो. १९३४, पृ. ५१३. शूद्र ही एक जमात होती, असे त्याच अंकात