पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५७
मरहट्ट सम्राट सातवाहन
 

असे आहे. अनेक घराणी आपल्या शिलालेखांत आपण चंद्रसूर्यवंशी असून मधुरा, अयोध्या हे आपले मूलस्थान, असे सांगतात. पण त्यावर काही अवलंबून नाही हे उघड आहे. ती घराणी पिढ्यान् पिढ्या कोठे राहिली, त्यांनी स्वभूमी - कर्मभूमी कोणती मानली यावरून हा निर्णय केला पाहिजे. आणि या दृष्टीने पाहिले तर सातवाहन हे घराणे संपूर्णपणे महाराष्ट्रीय होते याविषयी शंका राहात नाही. त्यांची राजधानी पैठण, त्यांचे कोरीव लेख नाशिक, कार्ले, कान्हेरी या परिसरात. त्यांच्या प्रारंभीच्या राजपुरुषांच्या प्रतिमा कोरल्या आहेत त्या जुन्नरजवळील नाणेघाटात. गाथासप्तशती हा ग्रंथ वर्णन करतो ते महाराष्ट्रजीवनाचे. यावरून या घराण्याचे महाराष्ट्रीयत्व वादातीत दिसते. त्यांची भाषा महाराष्ट्री प्राकृत होती हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. पण ती भाषा घेऊन ते पिढ्यान् पिढ्या अन्य प्रांतात राहिले असते तर त्यांना महाराष्ट्रीय म्हणणे अवघडच गेले असते. कांचीचे पल्लव हे सातवाहनाप्रमाणेच मोठे राजघराणे होते. त्यांची भाषा महाराष्ट्री होती. त्यांची एकंदर चार घराणी झाली. त्यांतील पहिल्या दोन घराण्यांचे काही शिलालेख प्राकृतात आहेत, काही संस्कृतात आहेत, तामीळमध्ये एकही नाही. ते शिव, विष्णू यांचे उपासक होते. त्यांनी याच देवतांची मंदिरे बांधली, तामीळ वाङ्मयातील देवतांची बांधली नाहीत. ( जर्नल ऑफ इंडियन हिस्टरी, नोव्हें. १९२२, दि ऑरिजिन अँड अर्ली हिस्टरी ऑफ दि पल्लवाज - डॉ. एस. कृष्णस्वामी आयंगार. ) तरीही तामीळनाड या भूमीत त्यांनी शतकानुशतक निवास केला व पराक्रम तेथेच केले. म्हणून ते महाराष्ट्र-भाषी असले तरी त्यांना तामीळीच मानणे युक्त होय. याच विचारसरणीने सातवाहन हे महाराष्ट्रीय ठरतात. त्यांची भाषा महाराष्ट्री प्राकृत होती या प्रमाणाने हा निर्णय जास्त दृढ होतो यात शंका नाही.

प्रारंभकाळ
 यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सातवाहनांच्या प्रारंभकाळाचा. अशोकाच्या मृत्यूच्या सुमारास म्हणजे इ. स. पूर्व २३६ च्या आसपास सातवाहन सत्तेला प्रारंभ झाला असे म. म. मिराशी यांचे मत असल्याचे वर सांगितलेच आहे. पण डॉ रा. गो. भांडारकर यांच्या मते हा काळ इ. स. पू. ७३ असा आहे आणि डॉ. डी. सी. सरकार यांच्या मते तो इ. स. पूर्व ३० पर्यंत अलीकडे येतो. डॉ. गोपाळाचारी यांनी ' सातवाहन साम्राज्य ' या आपल्या लेखात इ. पू. २३५ हा काळ निश्चित केला आहे तो मला ग्राह्य वाटतो. शकक्षत्रप रुद्रदामा याचा गिरनार येथील शिलालेख हा इ. स. १५० या वर्षांचा आहे हे बहुमान्य झाले आहे. त्यात त्याने दक्षिणापथपती शातकर्णी याचा उल्लेख केला आहे. हा शातकर्णी सातवाहन म्हणजे शिवश्री पुलुमायी होय, हेही आज बहुमान्य झाले आहे. सातवाहन वंशात एकंदर ३२ राजे होऊन गेले. त्यात शिवश्री पुलुमयी हा सव्विसावा राजा होय. पुराणात त्याच्या आधीच्या राजांच्या राजसत्तेची गणना दिली आहे; तीवरून हिशेब करता इ. स. १५० च्या मागे आपणांस