पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८१७
महाराष्ट्रीयांची कलोपासना
 

लोकांना होती व आजही ती तशीच कायम आहे. संगीत, नाट्य, चित्रपट, नृत्य, चित्र, शिल्प या कलांत महाराष्ट्रीयांनी जागतिक कीर्ती मिळविली आहे. नृत्य मागल्या काळी उत्तम अभ्यासले जात होतेव. फक्त ब्रिटिश काळात त्या कलेची प्रगती इतर कलांइतकी झाली नाही. तीही उणीव आता लवकरच भरून निघेल अशी आशा करण्यास जागा आहे. हा देश दगडांचा आहे असे त्याचे वर्णन केले जाते. ते खरे आहे. पण सह्याद्रीचे पहाड दुर्भेद्य असूनही त्यांतून अनेक नद्या पाझरतात, तसेच या दगडी मनातून कलांचे अनेक पाझर वाहत असतात असे दिसते. हीन अभिरुचीला बळी पडून कलेची पातळी सध्या खालावत आहे असे जाणकार सांगतात. पण लवकरच हे मळभ नाहीसे होऊन महाराष्ट्रीय कलेचा चंद्रमा पुन्हा पूर्ववत आल्हाद देऊ लागेल अशी आशा करू या.