पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
८१६
 

शिल्पकारांत अग्रगण्य म्हणजे गणपतराव म्हात्रे हे होत. 'मंदिरपथगामिनी' हा पूजेचे साहित्य घेऊन मंदिराकडे जाणाऱ्या एका महाराष्ट्रीय तरुणीचा यांनी जो पुतळा केला त्याची जगातल्या प्रत्येक देशातील कलाभिज्ञांनी अमाप प्रशंसा केली आहे. राजा रविवर्मा म्हणाले की 'इतकी सुंदर शिल्पाकृती यापूर्वी झाली नाही व पुढेही होईल की नाही याविषयी शंका आहे.' कोणी यांची तुलना मायकेल एंजेलोशी केली आहे. 'मॅगेझिन ऑफ आर्ट' (लंडन) या मासिकाने यांच्या 'मंदिरपथगामिनीचा' मोठा गौरव केला आहे. 'सरस्वती' या त्यांच्या शिल्पाचाही त्या मासिकाने असाच गौरव केला आहे. फ्रान्सच्या जागतिक कलाप्रदर्शनातही त्यांचा गौरव झाला. शिकागाेच्या कलाप्रदर्शनातही या कलाकृतीला मानाचे स्थान देण्यात आले होते. अनेक संस्थानांत यांनी घडविलेले शिवछत्रपतींचे अश्वारूढ पुतळे यांच्या असामान्य कलेची साक्ष देतात. राणा प्रतापसिंह, नाना फडणीस, राणा रणजितसिंह यांचेही प्लॅस्टरचे भव्य पुतळे यांनी बनविले आहेत. त्यांनी घडविलेल्या पुतळ्यांची संख्या जवळ जवळ दीडशेपर्यंत आहे. या कलाकृतींनी भारतीय कलेच्या इतिहासात म्हात्रे यांचे नाव अमर करून टाकले आहे.
 विनायक पांडुरंग करमरकर हे महाराष्ट्रातले दुसरे प्रसिद्ध शिल्पकार होत. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट व लंडन रॉयल ॲकॅडमी येथे त्यांचे शिक्षण झाले. १९२२ ते १९४५ पर्यंत त्यांनी अनेक शिल्पाकृती केल्या. अमेरिकेतील मिल्टन कॉलेजने मॉडेलिंगचे प्रात्यक्षिक देण्याकरिता यांना बोलाविले होते. आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ते एक वर्ष अध्यक्ष होते. पुण्यातील शिवछत्रपतींचा अश्वारूढ ब्राँझ पुतळा यांनीच घडविला आहे.
  र. कृ. फडके हेही आणखी नामवंत शिल्पकार होत. त्यांचे शिक्षण खाजगीरीत्याच झाले. पण अंगच्या प्रतिभेमुळे लवकरच त्यांनी शिल्पकार म्हणून नाव मिळविले. मुंबई, मद्रास, बडोदे येथील प्रदर्शनांत तर यांची शिल्पे मांडली गेलीच. पण लंडन, शिकागो, फिलाडेल्फिया येथील प्रदर्शनांतही त्यांच्या कलाकृतीला मानाचे स्थान मिळाले होते. बाँबे आर्ट सोसायटीचे शिल्पकलेचे सुवर्णपदक मिळविणारे फडके हे पहिलेच शिल्पकार होत. मुंबईच्या चौपाटीवरील लोकमान्यांचा पुतळा, इंदूर येथील महात्माजींचा पुतळा हे पुतळे फडके यांच्याच हातचे आहेत.
 वा. व. तालीम हे कित्येक वर्षे जे. जे. स्कूलचे सन्मान्य प्राध्यापक होते. ते एक ख्यातनाम शिल्पकार असून त्यांनी बनविलेले दादाभाई नौरोजी, महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल यांचे पुतळे त्याच्या कलेची साक्ष देतात. त्यांनी सुमारे ३०० शिल्पाकृती केल्या आहेत. बाँबे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक त्यांनी दोनदा मिळविले होते.
  महाराष्ट्रीयांच्या कलोपासनेचे गेल्या दोन प्रकरणांत वर्णन केले. त्यावरून असे दिसते की अगदी थेट सातवाहन काळापासून महाराष्ट्रात कलेची अभिरुची सर्वसामान्य