पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८१५
महाराष्ट्रीयांची कलोपासना
 

आर्ट' या विभागाचे प्रमुख. त्यांच्याच प्रयत्नाने व्यवहारोपयोगी चित्रकलेचा विभाग येथे सुरू झाला. 'इंडस्ट्रियल डिझायनिंग' हा यांचा आवडता विषय आहे. 'ब्रिटिश इन्स्टिटयूट ऑफ आर्ट अँड डिझाइन' या संस्थेने १९४७ साली यांना आपले सदस्य करून घेतले. हा मान मिळविणारे हे पहिलेच भारतीय कलावंत होत. ऑल इंडिया आर्ट बोर्डाचे हे तीन वेळा अध्यक्ष होते. अनेक सुवर्णपदके व पारितोषिके यांनी मिळविली आहेत.
 ज. द. गांधळेकर हे काही काल स्कूल ऑफ आर्टचे डीन होते. टाइम्स ऑफ इंडियामध्ये ते आर्ट डायरेक्टर म्हणून काम करतात. तैलचित्रे, मातकाम व पोर्टेट पेंटिंग हे यांचे आवडीचे विषय होत. के. के. हेब्बार हे कल्पनानिष्ठ चित्रे काढणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. खेडेगावातील वातावरणातील दृश्ये यांनी चितारली आहेत. त्यांच्या कलेत एकांगीपणा नाही. त्यांनी विविध शैलीतून चित्रे काढली आहेत. त्यातील सहजता उल्लेखनीय आहे. देऊसकर यांनी इंग्लंडमध्ये शिक्षण घेऊन चित्रकलेचा विशेष अभ्यास केला. बालगंधर्व रंगमंदिरातील गंधर्वांची चित्रे यांनीच काढली आहेत. दीनानाथ दलाल यांच्या चित्रांत रंगसंगतीबरोबर व्यक्तीचे भावदर्शन विशेष आढळते. पुणे येथील कॉमनवेल्थ इमारतीतील 'छत्रपती शिवाजी' यांचे अत्युत्तम तैलचित्र दलाल यांनी केलेले आहे. श्री. एस. एल. हळदणकर हे त्यांच्या जलरंगातील चित्रांसाठी प्रसिद्ध आहेत. जलरंगावर प्रभुत्व असलेले जे थोडे चित्रकार आहेत त्यांच्यांतील हे प्रथम श्रेणीचे कलाकार आहेत. व्यक्तिचित्रे काढण्यात यांचा हातखंडा आहे. अनेक प्रदर्शनांतून व चित्रसंग्रहांतून यांची चित्रे मांडली गेली आहेत.
 श्री. त्रिंदाद हे स्कूल ऑफ आर्टचे एक नामवंत शिक्षक असून जातिवंत कलावंत होते. 'विचारमग्न स्त्री' हे यांचे विशेष गाजलेले चित्र होय. व्यक्तिचित्रे व निसर्गचित्रे हे सारख्याच कौशल्याने रेखाटू शकतात. यांच्या सर्वच चित्रांत भावनांचा ओलावा जाणवतो. शिल्पकलेतही त्यांचा हातखंडा होता. त्यांनी थोडीच शिल्पे केली, पण ती जाणकारांच्या प्रशंसेस पात्र ठरली. विविध रंग वापरण्यात यांचे कौशल्य इतके अप्रतिम होते की त्यांना 'रंगकवी' असे संबोधले जाते.
 जी. एम्. सोलेगावकर हे असेच नामांकित चित्रकार आहेत. बाँबे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक व आर्ट सोसायटी ऑफ इंडियाची 'पटेल ट्रॉफी' यांनी मिळविली आहे. आधुनिक भारतीय शैलीत कल्पनांकन करण्यात ते निपुण आहेत. रेखांकन या कौशल्यात त्यांनी असामान्य व विपुल रंगबोधाची भर टाकली आहे. त्यांच्या चित्रात अनुकरण किंवा संकेत नाही. सोलेगावकर हे भित्तिचित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत.

शिल्प
 चित्रकलेप्रमाणेच शिल्पकलेतही महाराष्ट्रीयांनी जागतिक कीर्ती मिळविली आहे. या