पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
५६
 



अंदरमावळातील
 स. आ. जोगळेकर यांनी आपल्या 'दि होम ऑफ सातवाहनाज' या लेखात एक मोठे अभिनव, प्रबळ व ग्राह्य असे मत मांडले आहे. पुण्याशेजारी तळेगाव दाभाडे म्हणून एक लहानसे गाव आहे. त्याच्या नजीकच्या मावळाला अंदरमावळ - आंध्र मावळ -असे म्हणतात. त्याच्या जवळून दोन मैलांवरून आंध्रा याच नावाची नदी वहाते. ती राजापुरी या कार्ल्यापासून आठ मैलांवर असलेल्या खेड्याजवळ इंद्रायणीला मिळते. नदीवरून पूर्वी प्रदेशाला व लोकांनाही (सरस्वती-सारस्वत, सिंधु - हिंदु ) अशी नावे पडल्याची उदाहरणे अनेक आहेत. आंध्रा या नदीवरून त्या प्रदेशाला आंध्रमावळ व तेथल्या लोकांना आंध्र असे नाव पडले असण्याची पूर्ण शक्यता आहे. त्या परिसरात आजही आंध्रे नावाचे मराठे घराणे राहात आहे. यावरून सातवाहनांचे मूलस्थान आज अंदरमावळ म्हणून प्रसिद्ध असलेले मावळ हेच असावे असे अनुमान करण्यास हरकत नाही.
 डॉ. सुखटणकर यांच्या मते कर्नाटकातील बेल्लारी जिल्हा हे सातवाहनांचे मूलस्थान होय. या जिल्ह्यातील मायाकडोनी व हिरा हदगल्ली येथील कोरीव लेखांत सातवाहनी- हार व सातवाहनी रठ्ठ असे शब्द आले आहेत, हा पुरावा ते देतात. पण बेल्लारी हे सातवाहनांचे मूळस्थान असते तर प्रारंभीच्या सातवाहनांचे अनेक कोरीव लेख तेथे उपलब्ध व्हावयास हवे होते. हे लेख आहेत ते शेवटचा सातवाहन राजा पुलमायी याचे. त्यावरून हे अनुमान काढणे सयुक्तिक नाही. कर्नाटक हा सातवाहनमाम्राज्यात होता. तेव्हा तेथे त्याचे कोरीव लेख असणे हे स्वाभाविक आहे. तेवढ्यावरून ते त्याचे मूलस्थान ठरत नाही.

स्वभूमी - कर्मभूमी
 पण माझ्या मते एखादे राजघराणे वा राजकुल हे आंध्र आहे का कन्नड आहे का महाराष्ट्रीय आहे हे त्या घराण्याने स्वभूमी कोणती मानली, कर्मभूमी कोणती स्वीकारली, पिढ्यान् पिढ्या ते कोणत्या देशात राहिले, कोणत्या भूमीच्या जीवनाशी ते एकजीव झाले यावरून ठरविले पाहिजे. नेपोलियन हा इटलीजवळच्या कोर्सिका बेटातला मूळचा. पण त्याने फ्रान्स ही कर्मभूमी निवडली, फ्रेंचांसह पराक्रम केले. तो फ्रेंच झाला. आयसेन होअर, रूझवेल्ट हे मूळ जर्मन, डच असे होते. पण काही पिढ्या ही घराणी अमेरिकेत राहिली, ती त्यांनी स्वभूमी मानली व ते अमेरिकन झाले. राष्ट्रकूट घराण्याविषयी लिहिताना डॉ. आळतेकर म्हणतात, या घराण्याचा मूळ राजपुरुष दंतिदुर्ग याच्या चार पिढ्या महाराष्ट्रात गेल्या होत्या. त्यामुळे दंतिदुर्ग महाराष्ट्रीय झाला होता. मूळचे ते घराणे लातूर या कानडी भाषी परगण्यातले होते. ( अर्ली हिस्टरी ऑफ दि डेक्कन, सं. यजदानी, पृ. २५० ). भारतातल्या अनेक राजघराण्यांचे