पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८१३
महाराष्ट्रीयांची कलोपासना
 

यांच्या उदार देणगीमुळे ही संस्था स्थापन झाली. अर्थात तेथे पाश्चात्य चित्रकलेचाच अभ्यास सुरू झाला. भारतीय चित्रकलेचा अभ्यास करण्याजोगे त्या वेळी येथे काही शिल्लकच नव्हते. अभ्यासक नव्हते, ग्रंथ नव्हते आणि त्यांची अभिरुची असलेले लोकही नव्हते. जुन्या भारतीय कलापरंपरा नष्ट झाल्या होत्या. त्यामुळे छायाप्रकाशाचे हुबेहूब चित्रण करणाऱ्या इंग्लंडमधील ॲकॅडेमिक शैलीतच भारतीय कलाकार चित्रनिर्मिती करू लागले. पुढे विख्यात महाराष्ट्रीय चित्रकारांची माहिती दिली आहे. तीवरून महाराष्ट्रीय चित्रकलेची कल्पना येईल.
 राजा रविवर्मा हे मूळ महाराष्ट्रीय नव्हेत. ते केरळीय होते. पण अल्लादियाखां- सारखे ते येथे येऊन महाराष्ट्राशी एकरूप झाले होते. त्यातही विशेष म्हणजे त्यांनी जी लक्ष्मी, सरस्वती या देवतांची व ऊर्वशी, मेनका या अप्सरांची चित्रे काढली त्यांत त्या स्त्रियांना त्यांनी नऊवारी लुगडे व चोळी हा संपूर्ण महाराष्ट्रीय स्त्रीचाच पोषाख दिला. स्त्रीला सौंदर्यदृष्टीने हाच पोशाख आदर्श होय, असे त्यांचे मत होते. त्यामुळे त्यांची देवतांची चित्रे महाराष्ट्रात घराघरात गेली व सर्व महाराष्ट्रात ती अत्यंत लोकप्रिय झाली. इतकी लोकप्रियता दुसऱ्या कोणत्याही चित्रकाराला मिळाली नाही.
 रा. ब. महादेव विश्वनाथ धुरंधर हे जे. जे. स्कूलमधून बाहेर पडलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर महाराष्ट्रीय चित्रकार होत (१८६७- १९४४) भारतीयांची अलंकार- प्रधान शैली व पाश्चात्य वास्तववादी शैली यांचा सुरेख समन्वय धुरंधरांना साधला होता. ऑइल, वॉटर, पेन्सिल व इंक या सर्वच माध्यमांवर त्यांचे सारखेच प्रभुत्व होते. निसर्गचित्रण, फिगर ड्रॉइंग, स्केचिंग, पिक्चरकांपोझिशन, स्टिल लाइफ या सर्व प्रकारच्या चित्रणात त्यांचा हातखंडा होता. गतिमानता, प्रमाणबद्धता, भावपूर्णता व कलासंपन्नता ही त्यांच्या चित्रशैलीची वैशिष्ट्ये होत. अनेक देशी व विदेशी प्रदर्शनांत आपली चित्रे मांडून त्यांनी अनेक सुवर्णपदके व पारितोषिके मिळविली आहेत. रामायण, महाभारत, मेघदूत, शाकुंतल, भगवद्गीता इ. ग्रंथांतील प्रसंगांवर त्यांनी काढलेली चित्र विदेशांतही प्रशंसनीय ठरली. गौरी, नैवेद्य, सैरंध्री, लक्ष्मी, शिवाजीची मिरवणूक, राणी ताराबाई या त्यांच्या विशेष गाजलेल्या कलाकृती होत.
 आबालाल रहिमान हे धुरंधर युगातील मोठे कलोपासक होत. कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींच्या आश्रयाला ते होते. ते प्रामुख्याने निसर्गचित्रकार होते. प्रत्यक्ष अवलोकन व अभ्यास करून ते चित्रे काढीत. त्यामुळे त्यात जिवंतपणा असे. पंचगंगा घाट, कोटीतीर्थ, रावणेश्वर, हत्तीची टक्कर, रायबागचे देवालय ही त्यांची सर्वोत्कृष्ट चित्रे होत.
 श्री. म. केळकर हे धुरंधर युगातीलच चित्रकार होत. त्यांनी अनेक व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. अनेक कलाप्रदर्शनांत चित्रे मांडून त्यांनी पुरस्कार व बक्षिसे मिळविली. त्यांच्या व्यक्तिचित्रांना व्हाइसरॉय- सुवर्णपदकही मिळाले होते. कलेच्या उत्तेजनार्थ मुंबईला 'बॉम्बे आर्ट सोसायटी' स्थापन झालेली आहे. तिचे व 'आर्ट सोसायटी ऑफ इंडिया' या संस्थेचे ते तहाहयात सभासद होते.