पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
८१२
 

त्यांना नावेही तेव्हाच मिळाली. त्यातील दोन उत्तरेकडच्या व दोन दक्षिणेकडच्या आहेत. महाराष्ट्राने स्वतःची अशी स्वतंत्र नृत्यपद्धती जोपासलेली नाही. वरील पद्धती महाराष्ट्रात आल्या त्या ब्रिटिश कालात.

गोमांतक
 गोमांतक हे सर्व कलांचे माहेरघर आहे त्याचप्रमाणे नृत्यकलेचेही आहे. गोमांतकात जेवढ्या म्हणून नामांकित गायिका झाल्या त्यांपैकी बहुतेक चांगल्या नर्तिकाही होत्या. तथापि नृत्यकलेत विशेष प्रावीण्य मिळविले त्या गायिका म्हणजे ताराबाई कुमठेकर या होत. त्या बिहारीलाल व पूरणलाल यांच्या शिष्या होत. विसाव्या शतकाच्या आरंभी त्यांचे नाव विशेष गाजले होते. जनाबाई साखळकर या अशा दुसऱ्या नर्तकी होत. भास्करबुवा, वझेबुवा यांसारखे नांमांकित गवईही त्यांचा मुक्तकंठाने गौरव करीत. चंद्रकलाबाई यांनी नृत्याची विशेष साधना केली होती. भारतामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. चंपाबाई वाकळीक या कथ्थक नृत्यात प्रसिद्ध असून इंदूर, ग्वाल्हेर इ. ठिकाणी त्यांचे सत्कारही झालेले आहेत. नर्तकीप्रमाणे गोव्याचे नर्तकही प्रसिद्ध आहेत. धर्माजी जांबावलीकर हे जुन्या जमान्यातील नर्तक होत. हे कालिकाविंदाचे शिष्य. त्यांनी आपल्या नृत्याचा भारतभर दौरा काढला होता. दुसरे नर्तक म्हणजे राजाराम मांजरेकर. यांनी एकदा सिनेमासृष्टी गाजविली होती.
 मुंबईला जव्हेरी भगिनी आणि कनक रेळे या नर्तिकांनी मणिपुरी नृत्यात विशेष कीर्ती मिळविली आहे.
 मुंबई शहर व्यापारी शहर झाले व तेथे धनसमृद्धी झाली. त्यामुळे तेथे सर्व कलांना उदार आश्रय मिळू लागला. त्यामुळे उत्तरेकडचे मोठमोठे गायनाचार्य जसे मुंबईत व महाराष्ट्रात येऊन राहिले, तसेच अनेक मोठमोठे नृत्यविशारदही येथे येऊन राहिले. लच्छू महाराज, सुंदरप्रसाद, गौरीशंकर, गोपीकृष्ण, कृष्णन् कुट्टी, विपिन सिंह, गोविंदराज पिले इ. अनेक जाणकार मुंबईत वास्तव्य करून येथलेच झाले आहेत.
 यांच्या सहवासाने व त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन पार्वतीकुमार, मोहनराव कल्याणपूरकर, दमयंती जोशी इ. कलाकार आज या क्षेत्रात कार्य करीत आहेत. रोहिणी भाटे यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. त्यांनी पुण्याला नृत्यसंस्था स्थापून अनेक शिष्या तयार केल्या आणि महाराष्ट्रभर या कलेची अभिरुची निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. सुचेता जोशी, प्रभा मराठे यांची नावे सध्या सुप्रसिद्ध झाली आहेत.
 हा नृत्याचा विचार झाला. आता चित्र व शिल्प यांचा विचार करावयाचा.

चित्रकला
 महाराष्ट्रात अर्वाचीन काळी चित्रकलेचे उज्जीवन झाले ते १८५७ साली मुंबईला जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् या संस्थेच्या स्थापनेनंतर सर जमशेटजी जीजीभाई