पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
८१०
 

काढली. त्यांनी प्रथम खांडेकरांच्या कथेवर 'छाया' हा चित्रपट काढला. त्याचे दिग्दर्शन मास्टर विनायक यांनी केले. आणि प्रमुख भूमिका लीला चिटणीस, बाबूराव पेंढारकर व विनायक यांनी केल्या. या सर्वांच्या प्रभावामुळे 'छाया' चित्रपटाला फार लोकप्रियता लाभली. पुढे अत्रे यांच्या अत्यंत प्रभावी कथा हंस चित्राला मिळाल्या. त्यांनी प्रथम 'धर्मात्मा' हा चित्रपट काढला व नंतर 'ब्रह्मचारी' तयार केला. या चित्रपटाने तर लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. यातील मास्टर विनायक, मीनाक्षी व दामुअण्णा मालवणकर यांच्या भूमिका अविस्मरणीय झाल्या आहेत. यानंतर हंसचित्राने 'ब्रँडीची बाटली', 'देवता', 'सुखाचा शोध', 'अर्धांगी' असे एकाहून एक नावीन्यपूर्ण चित्रपट काढले. यांच्या कथा खांडेकर व अत्रे यांच्या आहेत व भूमिका मा. विनायक, मीनाक्षी, बाबूराव पेंढारकर, साळवी, दामुअण्णा मालवणकर या अव्वल नटांच्या आहेत, इतके सांगितले की पुरे.
 हे युग चित्रपटांच्या अमाप लोकप्रियतेचे असल्यामुळे नवयुग, अत्रे पिक्चर्स, अरुण स्टुडिओ (भालजी पेंढारकर) अशा कंपन्या भराभर निघाल्या व त्यांनी पायाची दासी, गोरखनाथ, थोरातांची कमळा असे चित्रपट काढले. त्यांत के. नारायण काळे (दिग्दर्शक), वनमाला (नटी), ग. दि. माडगूळकर (गीतकार) असे नवे कलाकार उदयास आले.
 यानंतरच्या स्वातंत्र्याच्या काळात जयमल्हार, रामजोशी, होनाजी बाळा, अमर भूपाळी, पेडगावचे शहाणे, लाखाची गोष्ट, ऊनपाऊस, जगाच्या पाठीवर, वहिनींच्या बांगड्या, छत्रपती शिवाजी, वासुदेव बळवंत, महात्मा फुले असे अनेक उत्तम चित्रपट निघाले व त्यांतूनच राजा परांजपे, सुलोचना, दत्ता धर्माधिकारी, राजा गोसावी, ललिता पवार, हंसा वाडकर, विश्वास कुंटे, वसंत देसाई, सुधीर फडके असे अनेक कलाकार उदयास आले. या काळातला 'श्यामची आई' (साने गुरुजी) हा आचार्य अत्रे यांचा चित्रपट विशेष उल्लेखनीय आहे. त्याला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले. 'सांगत्ये ऐका' हा अनंत माने यांचा चित्रपट एकशे एकतीस आठवडे चालला व त्याने मागले सगळे उच्चांक मोडून टाकले.
 स्वातंत्र्योत्तर काळात मराठी चित्रपटसृष्टीला अनेक उत्तमोत्तम कलावंतांचा व तंत्रज्ञांचा लाभ झाला. त्यांत, राजा परांजपे, राम गबाले, अनंत माने, राजा ठाकूर, शांताराम आठवले, माधव शिंदे, दिनकर पाटील, राजदत्त यांच्यासारखे दिग्दर्शक; ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, ग. रा. कामत, मधुसूदन कालेलकर, मधुकर पाठक, पु. ल. देशपांडे यांसारखे उत्कृष्ट पटकथा लेखक; पं. महादेवशास्त्री जोशी, पु. भा. भावे, अरविंद गोखले, द. र. कवठेकर, य. गो. जोशी यांसारखे कथालेखक; सुधीर फडके, वसंत पवार, वसंत प्रभू, राम कदम, दत्ता डावजेकर, यांसारखे संगीत दिग्दर्शक; ग. दि. माडगूळकर, जगदीश खेबुडकर, संजीव इ. गीतलेखक; ई. महंमद, दत्ता गोर्ले, बाळ बापट, अरविंद लाड इ. छायालेखक हे