पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०९
महाराष्ट्रीयांची कलोपासना
 

शांताराम आठवले आणि मुख्य कलाकार- विष्णुपंत पागनीस असे होते. याची भारतात तर कीर्ती झालीच पण जागतिक चित्रस्पर्धेतही याला तिसरे पारितोषिक मिळाले. यातील जिजाऊची भूमिका गौरीबाई यांनी आणि सालोमालोची भूमिका काका भागवत यांनी केली होती. यानंतर प्रभातने तीन सामाजिक विषयांवर चित्रपट काढले. 'कुंकू', 'माणूस' व 'शेजारी' हे ते चित्रपट होत. हे चित्रपट म्हणजे प्रभातच्या सांघिक कलाकीर्तीचे दीपस्तंभ होत. यांचे दिग्दर्शन शांतारामबापूंनी केले होते. कथा अनुक्रमे ना. ह. आपटे, अनंत काणेकर व विश्राम बेडेकर यांच्या होत्या. 'कुंकू' व 'माणूस' चे संगीत केशवराव भोळे यांचे व 'शेजारी' याचे मास्टर कृष्णराव यांचे होते. कुंकुमध्ये प्रमुख भूमिका केशवराव दाते व शांता आपटे यांच्या होत्या. त्या अगदी अविस्मरणीय आहेत. माणूसमध्ये शाहू मोडक व शांता हुबळीकर यांनी व शेजारीमध्ये केशवराव दाते व गजानन जागीरदार यांनी अशाच उत्तम भूमिका केल्या आहेत.

'रामशास्त्री'
 यानंतर प्रभातने 'माझा मुलगा', 'ज्ञानेश्वर' इ. चित्रपट काढले. तेही प्रभातच्या कीर्तीला साजेसेच होते. पुढे शांतारामबापू यांनी प्रभात कंपनी सोडली व 'राजकमल' ही कंपनी मुंबईस काढली. प्रभातने यानंतर उत्कृष्ट चित्रपट काढला तो म्हणजे 'रामशास्त्री' हा होय. यातील गजानन जागीरदार यांची रामशास्त्री यांची भूमिका लोक कधीही विसरणार नाहीत.
 प्रभातच्या 'अयोध्येच्या राजा'ची कीर्ती गाजत असतानाच 'सरस्वती सिनेटोन'चे दादासाहेब तोरणे यांनी 'शामसुंदर' हा चित्रपट काढला. त्याची कथा व दिग्दर्शन भालजी पेंढारकर यांचे, तर राधा व कृष्ण यांच्या भूमिका शांता आपटे व शाहू मोडक यांच्या होत्या. हा बोलपट २२ आठवडे एकाच चित्रमंदिरात चालला. अशी अपूर्व लोकप्रियता याला मिळाली. सरस्वती सिनेटोनचा यानंतरचा 'भक्त प्रल्हाद' हा चित्रपट असाच गाजला.
 प्रभातने कोल्हापूर सोडल्यावर शाहू महाराजांच्या आश्रयाने मेजर दादासाहेब निंबाळकर, भालजी पेंढारकर, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी 'कोल्हापूर सिनेटोन' ही कंपनी काढली. तिने अल्पावधीतच श्रीकृष्णचरित्रावर 'आकाशवाणी' हा लोकप्रिय चित्रपट काढला व नंतर वरेरकरांच्या कथेवर आधारित असा 'विलासी ईश्वर' हा चित्रपट काढला.

'हंस चित्र'
 पण थोड्याच अवधीत भालजी पेंढारकर, बाबूराव पेंढारकर व मास्टर विनायक हे कोल्हापूर सिनेटोनमधून बाहेर पडले व त्यांनी 'हंस चित्र' नामक नवी चित्रसंस्था