पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
८०८
 

छायालेखन, नेपथ्य सर्व बाबूरावांनीच केले होते. इतकेच नव्हे, तर कॅमेरा त्यांनी स्वतःच बनविला होता. फाळके यांच्या चित्रपटापेक्षा बाबूरावांचे चित्रपट अनेक दृष्टींनी सरस होते. केवळ चमत्कृतीपेक्षा अभिनय, कथानकाची कलात्मक मांडणी, त्याद्वारा लोकांना काही संदेश देणे या गोष्टीकडे बाबूराव अधिक लक्ष देत. तेव्हा ध्येयवादी व कलात्मक चित्रपटांची परंपरा बाबूराव पेंटरांच्यापासूनच सुरू झाली.
 सैरंध्रीनंतर 'सुरेखा अभिमन्यू', 'वत्सलाहरण' हे चित्रपट महाराष्ट्र फिल्म कंपनीने काढले. आणि त्यानंतर इतिहासाकडे दृष्टी वळवून हरिभाऊ आपटे यांच्या कादंबरीच्या आधारे 'सिंहगड' हा नरवीर तान्हाजीच्या हौताम्यावर चित्रपट काढला. हा चित्रपट अत्यंत लोकप्रिय झाला. त्यानंतर १९२५ साली सुप्रसिद्ध 'सावकारी पाश' हा चित्रपट बाबूरावांनी काढला. हा पहिला सामाजिक चित्रपट होय. चंद्रकांत व विष्णुपंत औंधकर यांच्या भूमिकांमुळे हा अत्यंत यशस्वी झाला.

'प्रभात'
 या वेळी व्ही. शांताराम, केशवराव धायबर, एस. फत्तेलाल व विष्णुपंत दामले हे कलाकार 'महाराष्ट्र फिल्मकंपनी'तच होते. पण बाबूरावांशी न जमल्यामुळे ते बाहेर पडले व त्यांनी कोल्हापूरलाच १९२९ साली 'प्रभात फिल्म कंपनी'ची स्थापना केली व थोड्याच काळात 'गोपाळकृष्ण' हा प्रभातचा पहिला चित्रपट पडद्यावर आला. त्याने 'प्रभात'ला एकदम कीर्ती मिळवून दिली.

बोलपट
 यानंतर बोलपटाचे युग सुरू झाले. तेव्हा त्यांचा सांगोपांग अभ्यास करून प्रभात कंपनीने 'अयोध्येचा राजा' हा पहिला बोलपट काढला. यात हरिश्चंद्राचे काम गोविंदराव टेंबे यांनी, तारामतीचे काम दुर्गाबाई खोटे यांनी आणि खलनायक गंगानाथ महाजन याचे काम बाबूराव पेंढारकर यांनी केले होते. ही सर्व कामे अप्रतिम झाली. शिवाय व्ही. शांताराम यांचे दिग्दर्शन, फत्तेलाल यांची सजावट व धायबर यांचे छायालेखन यामुळे प्रारंभीच्याच या बोलपटाला उदंड यश मिळाले. यानंतर 'मायामच्छिंद्र' हा चित्रपट प्रभातने काढला, तोही यशस्वी झाला. १९३३ साली प्रभात फिल्म कंपनी पुण्यास आली व तिने प्रथम एकनाथाच्या जीवनावर 'धर्मात्मा' हा चित्रपट काढला. त्यात बालगंधर्वांनी एकनाथांचे काम केले होते. पण तो व्हावा तितका यशस्वी झाला नाही. पण त्यानंतर दर्यावर्दी जीवनावर शांतारामबापूंनी काढलेला 'अमरज्योती' हा चित्रपट, त्यातील नावीन्यामुळे, फारच लोकप्रिय झाला. 'अमरज्योती' नंतरचा प्रभातचा चिरस्मरणीय चित्रपट म्हणजे 'तुकाराम' हा होय. त्याचे दिग्दर्शक दामले व फत्तेलाल, संगीत दिग्दर्शक केशवराव भोळे, सर्वांगीण दिग्दर्शक शांताराम बापू व राजा नेने, कथासंवाद- शिवराम वाशीकर, गीतलेखक-