पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०७
महाराष्ट्रीयांची कलोपासना
 

वळण लावले.
 या काळात विशेष गाजलेली नाटके म्हणजे 'हिमालयाची सावली', 'नटसम्राट', ,प्रेमा तुझा रंग कसा ?', 'मला काही सांगायचंय', 'अश्रूंची झाली फुले', 'तो भी नव्हेच', 'रायगडला जेव्हा जाग येते', 'वेड्याचे घर उन्हात', 'तुझे आहे तुजपाशी', 'वाहतो ही दुर्वाची जुडी', 'गारंबीचा बापू', 'शांतता! कोर्ट चालू आहे', 'अशी पाखरे येती' ही होत. याच काळात संगीत रंगभूमीचाही पुनरुद्धार झाला व 'होनाजी बाळा', 'पंडितराज जगन्नाथ', 'मंदारमाला', 'कटयार काळजात घुसली' इ. नाटके लोकप्रिय झाली.
 मराठी नाट्यसृष्टीचे स्वरूप हे असे आहे. हे वैभव मोठे आहे, स्पृहणीय आहे. यात आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते. मराठी रंगभूमी केवळ करमणूकप्रधान आहे असे वर म्हटले आहे. पण वर उल्लेखिलेली अलीकडची 'हिमालयाची सावली' इ. जी गद्य नाटके ती जीवनभाष्यही मार्मिक रीतीने करीत आहेत असे दिसते. त्या दृष्टीने मागल्या सामाजिक नाटकांच्या तुलनेने त्यांची उंची मोठी वाटते. तेव्हा मराठी रंगभूमीची उत्तरोत्तर प्रगती होत जाईल अशी आशा करण्यास हरकत नाही.

चित्रपट
 चित्रपट कला ही नाट्यकलेइतकीच मोठी महत्त्वाची आहे. मराठी कलावंतांनी या कलेतही मोठी कीर्ती व नाव मिळविले आहे. या कलेचे आद्यप्रवर्तक म्हणजे दादासाहेब फाळके हे होत. १९११ साली महाराष्ट्रात पाश्चात्य चित्रपट येऊ लागले. त्यापासून दादासाहेबांना स्फूर्ती मिळाली. १९१२ साली साधनसामग्री जमविण्यासाठी ते इंग्लंडला गेले आणि परत येऊन १९१३ साली त्यांनी 'राजा हरिश्चंद्र' हा मराठीतला पहिला चित्रपट काढला. ती पौराणिक कथा प्रत्यक्ष पडद्यावर येताच तिला अमाप कीर्ती मिळाली. यानंतर 'भस्मासुर मोहिनी' व 'सावित्री' हे दोन चित्रपट दादासाहेबांनी काढले. ते महाराष्ट्रात तर लोकप्रिय झालेच. पण दादासाहेबांनी ते इग्लंडला नेऊन दाखविले तेव्हा तेथेही त्यांचे फार कौतुक झाले. त्यानंतर दादासाहेबांनी एकंदर १७ चित्रपट तयार केले. भांडवलाचा पुरवठा व्यवस्थित व्हावा म्हणून त्यांनी 'हिंदुस्थान फिल्म कंपनी'ही काढली. पण ती फार चालली नाही आणि दादासाहेबांचा सुवर्णकाळ लवकरच संपला. दादासाहेब हे केवळ चित्रपटाचे निर्माते नव्हते, तर रंगभूषाकार, छायाचित्रकार, नेपथ्यकार व तंत्रज्ञही तेच होते. यामुळे भारतात चित्रपटयुगाचे प्रवर्तक म्हणून त्यांना मिळालेला मान सर्वथैव योग्यच आहे.
 दादासाहेबांच्या सारखेच दुसरे मोठे चित्रपटकार म्हणजे बाबूराव पेंटर हे होत. १९१९ साली त्यांनी कोल्हापूर येथे 'महाराष्ट्र फिल्म कंपनी'ची स्थापना केली व 'सैरंध्री' हा पहिला चित्रपट काढला. तो इतका उत्तम निघाला की तो पाहून लो. टिळकांनी बाबूरावांना 'सिनेमाकेसरी' अशी पदवी दिली. चित्रपटाचे दिग्दर्शन,