पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
८०४
 

निश्चित स्थान आहे. पण त्यांच्या प्रवेशाला अवास्तव महत्त्व आल्यामुळे केव्हा केव्हा विरस होतो. तरीही वर सांगितल्याप्रमाणे करुण आणि हास्य यांच्या बळावर गडकऱ्यांची नाटके मराठीत कायम प्रभावी राहतील असे वाटते.
 गडकऱ्यांची नाटके चालू असतानाच वरेरकरांचा नाट्यसंसार सुरू झाला होता. 'कुंजविहारी' हे त्यांचे पहिले नाटक. त्यानंतर 'हाच मुलाचा बाप', 'संन्याशाचा संसार', 'सत्तेचे गुलाम', 'तुरुंगाच्या दारात' ही त्यांची नाटके बरीच गाजली. यांत सामाजिक व क्वचित राजकीय समस्या त्यांनी हाताळल्या आहेत; पण अवास्तव, कल्पनारम्य घटनांचा त्यांनी भरपूर उपयोग केला आहे. वरेरकरांच्या अखेरीपर्यंत या दोषांतून मराठी नाटक सुटले नव्हते. त्याला सोडविले ते 'नाट्यमन्वंतर' या संस्थेच्या 'आंधळ्यांची शाळा' या नाटकाने. 'मराठी नाटक आज रंगभूमीवर अवतरले,' असे ते पाहून प्रेक्षकांना वाटले. पण दुर्दैवाने 'नाट्यमन्वंतर' पुढे टिकले नाही. अगदी अल्पावकाशात ते विराम पावले.
 १९३० नंतर प्र. के. अत्रे यांचे युग सुरू झाले. 'साष्टांग नमस्कार' हे त्यांचे पहिले नाटक. त्याने मराठी रंगभूमीचे रूपच पालटून टाकले. त्यानंतर 'भ्रमाचा भोपळा', 'लग्नाची बेडी', 'पराचा कावळा', 'घराबाहेर', 'उद्याचा संसार', 'वंदे मातरम्', अशी नाटके त्यांनी लिहिली व सिनेमामुळे पडता काळ आलेल्या मराठी रंगभूमीला सावरून धरले. त्यांची बहुतेक नाटके विनोदप्रधान आहेत. पण 'घराबाहेर' व 'उद्याचा संसार' यात त्यांनी सामाजिक समस्याही हाताळल्या आहेत. पण एकंदरीत पाहता विनोद हाच अत्र्यांच्या नाटकाचा स्थायी भाव आहे.
 अत्रे यांच्यानंतर मराठी रंगभूमीला सावरण्याचे कार्य मोतीराम गजानन रांगणेकर यांनी केले. 'आशीर्वाद', 'कुलवधू', 'नंदनवन', 'माझे घर', 'वहिनी' ही त्यांची नाटके त्या वेळी पुष्कळ लोकप्रिय होती. विशेषतः 'कुलवधू' हे नाटक त्या वेळी फारच गाजत होते. चित्तवेधक संवाद व नवी सजावट यामुळे मराठी रंगभूमी त्यांनी खूपच बदलून टाकली. शिवाय नाटक हे वाचण्यासाठी नसून पाहण्यासाठी आहे, हा कटाक्ष ठेवून त्यांनी नाटके लिहिल्यामुळे त्यांच्या नाटकांत 'नाट्य' पुष्कळच साधले आहे. त्यांचा विनोदही अकृत्रिम व प्रसंगनिष्ठ असतो. त्यामुळे रांगणेकरांना नाट्यसृष्टीत बरेच वरचे स्थान आहे.
 माधव नारायण जोशी यांनी एके काळी नाट्यसृष्टी पुष्कळच गाजविली. 'स्थानिक स्वराज्य', 'वऱ्हाडचा पाटील', 'गिरणीवाला', 'पैसाच पैसा', 'प्रो. शहाणे' ही त्यांची नाटके. सामाजिक दोष हेरून त्यावर विडंबनात्मक टीका करण्यात त्यांचा हातखंडा होता. विशेषतः 'स्थानिक स्वराज्या'त हा त्यांचा गुण विशेष दिसून येतो. विकृती, अतिशयोक्ती इ. विनोदी साधनांच्या आश्रयाने त्यांनी सामाजिक दोषांवर मर्मभेदक टीका केली आहे. पण त्यांच्या नाटकांत अनेक वेळा फार अश्लीलता येते. हे गालबोट वगळता एके काळी ते एक मोठे सामाजिक टीकाकार होते असे म्हणावयास