पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०३
महाराष्ट्रीयांची कलोपासना
 

 कोल्हटकरांच्या बरोबरच कृ. प्र. खाडिलकर उदयास येत होते. 'सवाई माधवरावाचा मृत्यू' हे त्यांचे पहिले नाटक. हेच खरे कलासंपन्न असे ऐतिहासिक नाटक होय. त्यांच्या 'कांचनगडची मोहना' या नाटकाला इतिहासाचा आधार जवळजवळ नाहीच. पण तेही त्या काळी खूप गाजले. खाडिलकरांचे सर्वोत्तम नाटक म्हणजे 'भाऊबंदकी'. रघुनाथराव व नारायणराव यांच्या भाऊबंदकीतून त्यांनी त्या काळच्या राजकीय भिन्नपक्षांचे पडसाद उमटविले आहेत. संवाद, व्यक्तिरेखा या सर्वच दृष्टींनी हे नाटक अमाप कीर्ती मिळवून गेले. 'कीचकवध' हे पौराणिक नाटक त्यांनी कर्झनशाहीच्या जुलमावर लिहिले आहे. प्रा. फडके यांच्या मते, जागतिक कीर्ती मिळावी, इतके ते नाटक उत्तम आहे. त्यातील कीचक हा लोकांना मूर्तिमंत कर्झन वाटे. यामुळेच सरकारने ते नाटक जप्त केले. त्यानंतर खाडिलकरांनी संगीत नाटके लिहिण्यास प्रारंभ केला आणि बालगंधर्वांनी ती नाटके कसोशीने रंगभूमीवर आणल्यामुळे खाडिलकरांची आजची सर्व कीर्ती त्यांच्या संगीत नाटकांवरच उभी आहे. मानापमान, विद्याहरण व स्वयंवर ही त्यांची नाटके फारच गाजली. खरे पाहता नाट्यकलेच्या दृष्टीने ही नाटके सुमार आहेत. पण लोकांना मोहिनी आहे ती त्यातील संगीताची. त्यामुळे ती नाटके खरीखुरी खाडिलकरांची नसून बालगंधवांचीच आहेत, असे म्हणावेसे वाटते. त्यांची मेनका, सावित्री, द्रौपदी ही नाटके फारच हीन दर्जाची आहेत. काही काळ संगीतामुळे व गंधर्वामुळे ती रंगभूमीवर चालली, पण आज लोक त्यांना विसरून गेले आहेत आणि ती त्याच लायकीची आहेत. या सर्व दृष्टींनी पाहता किर्लोस्करांचे सौभद्र व देवलांची शारदा व संशयकल्लोळ हीच नाटके नाट्यकलेच्या दृष्टीने जास्त सरस आहेत. तशी कला भाऊबंदकी हा अपवाद वगळता कोल्हटकर व खाडिलकर या दोघांनाही साधली नाही.
 गडकरी हे स्वतः कोल्हटकरांचे शिष्य म्हणवीत. आणि त्यांची नाटके अगदी निराळ्या धर्तीची असली तरी, कल्पनारम्य, अद्भुत, अवास्तव प्रसंग नाटकात खेचून भरण्यात त्यांनी गुरूचेच अनुकरण केले आहे. 'प्रेमसंन्यास' नाटकात त्यांनी विधवाविवाहाचा विषय हाताळला आहे. पण तत्कालीन वास्तव जगाचे हे चित्र आहे, असे कधीच वाटत नाही. 'पुण्यप्रभाव' हे नाटक तर येथून तेथून कल्पनारम्यतेच्या वातावरणातच आहे. 'भावबंधना'त वास्तवतेचा स्पर्श जरा जाणवतो आणि 'एकच प्याला' हे बरेचसे वास्तववादी नाटक झाले आहे. गडकऱ्यांच्या नाटकात असे दोष असले तरी करुण आणि हास्य यावर त्यांचे विलक्षण प्रभुत्व असल्यामुळे त्यांची भावबंधन व एकच प्याला ही नाटके आजही प्रभावी राहिली आहेत. प्रेमसंन्यास व पुण्यप्रभाव यात मथुरा, गोकुळ, कंकण, किंकिणी, नूपुर यांच्या विनोदालाच पुष्कळ वेळा प्राधान्य येते. भावबंधन व एकच प्याला यात उगीचच दोन कथानके त्यांनी एकत्र केली आहेत. एकच प्याला या नाटकात विधवाविवाहाच्या प्रश्नाचे प्रवेश येण्यात कसलेच स्वारस्य नाही. तळिराम व त्याचे सगेसोबती यांना विषयात