पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
८०२
 

 यानंतर मध्यंतरीच्या काळात भाषांतरित नाटकाला सुरुवात झाली. १८५१ साली परशुरामतात्या गोडबोले यांनी उत्तर रामचरिताचे भाषांतर केले. आणि मग पुढे वेणीसंहार, प्रबोध चंद्रोदय, प्रसन्नराघव, मालती-माधव, जानकी-परिणय, नागानंद इ. नाटकांची मराठीत भाषांतरे होऊ लागली. त्यानंतर लवकरच १८६१ साली विनायक जनार्दन कीर्तने यांनी 'थोरले माधवराव पेशवे' हे नाटक लिहिले. हे मराठीतले पहिले नाटक, कारण हे नाटक म्हणजे नाटकाला अवश्य असा जो लिखित नाट्य प्रबंध, जो भावे यांच्या नाटकात नव्हता, तो होता. इचलकरंजीकर नाटक मंडळीने हे नाटक रंगभूमीवर आणले. त्यानंतरच्या काळात १८७४ साली महादेवशास्त्री कोल्हटकर यांनी ऑथेल्लो या शेक्सपियरच्या नाटकाचे मराठीत भाषांतर केले आणि तेथून पुढे मराठीत शेक्सपियरच्या नाटकांची भाषांतरे होऊन ती रंगभूमीवरही येऊ लागली. याच काळात 'स्वैरसकेशा' सारखी काही सामाजिक विषयावर नाटके लिहिली गेली. शिकलेल्या स्त्रियांची टवाळी व बीभत्स निंदा करणे हाच त्यांचा हेतू होता. पण त्या नाटकांना नाटकाचे रंगरूप असे काही नव्हते. त्यांची रचना अत्यंत शिथिल असून संवाद, स्वभावलेखन इ. कोणतेच गुण त्यात नव्हते.
 म्हणून या सर्व दृष्टींनी विचार करता अण्णासाहेब किर्लोस्कर हेच अर्वाचीन रंगभूमीचे जनक ठरतात. त्यांच्या 'संगीत शाकुंतला'ने नवे युगच सुरू केले. त्यानंतर त्यांनी 'सौभद्र' व 'रामराज्य वियोग' अशी दोन नाटके लिहिली. दुर्दैवाने त्यांच्या अकाल मृत्यूने रामराज्यवियोग हे अपुरे राहिले. पण शाकुंतल व सौभद्र यांनी आपले कार्य करून टाकले होते. सौभद्राची लोकप्रियता तर अजून कायम आहे. किर्लोस्करांनंतरचे मोठे नाटककार म्हणजे देवल हे होत. प्रथम त्यांनी 'विक्रमोर्वशीय,' 'मृच्छकटिक' ही भाषांतरित नाटके लिहिली. बाणाच्या कादंबरीच्या आधारे 'शापसंभ्रम' हे लिहिले आणि 'ऑथेल्लो'च्या आधारे 'झुंझारराव' हे नाटक लिहिले. पण देवलांची खरी कीर्ती झाली ती 'शारदा' नाटकाने तो प्रश्न समाजाच्या इतक्या जिव्हाळ्याचा आहे की त्या एकाच नाटकाने त्यांना अमर कीर्ती मिळवून दिली आहे. त्यांचे 'संशय कल्लोळ' हे नाटकही असेच लोकप्रिय आहे.
 १८९६ साली श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे युग सुरू झाले. वीरतनय हे त्यांचे पहिले नाटक. त्यानंतर मूकनायक, गुप्तमंजूष, प्रेमशोधन, मतिविकार ही नाटके त्यांनी लिहिली. कोल्हटकरांनी नाटकांसाठी विषय सामाजिक घेतले तरी कथानके सर्व कल्पनारम्य अशी रचली. वास्तवाशी त्यांचा कसलाही संबंध त्यांनी ठेवला नाही. संभवनीयता, असंभवनीयता यांकडेही त्यांनी लक्ष दिले नाही. तरीही १८९६ ते १९१० या काळात किर्लोस्कर मंडळीच्या रंगभूमीवर त्यांच्या नाटकांना खूप लोकप्रियता मिळाली. त्यानंतर कोल्हटकरांचा काळ संपला. त्यांच्या नाटकांत विनोद आहे, व्यक्तिरेखा आहेत, पण हे सर्व कमालीचे कृत्रिम आहे. त्यामुळे वाङ्मयकलेच्या दृष्टीने त्या नाटकांना आज महत्त्व नाही.