पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७९०
 

दिगंबरांनी हे सर्व बदलून टाकले. त्यांनी लाहोर, नागपूर, मुंबई व पुणे येथे संगीताची गांधर्व महाविद्यालये स्थापन केली. आणि फी देऊन इतर शिक्षणाप्रमाणेच संगीताचे शिक्षण मिळण्याची सोय केली. दुसरे कार्य म्हणजे त्यांनी संगीताचे नोटेशन किंवा स्वरलेखनपद्धती सुरू केली हे होय. यामुळे विद्यार्थ्यांची फार मोठी सोय झाली. आज महाराष्ट्रात घरोघर संगीताची अभिरुची निर्माण झाली आहे, त्याचे श्रेय पंडितजींनाच आहे. नारायणराव व्यास, पटवर्धनबुवा, पाध्येबुवा, ओंकारनाथ ठाकूर हे त्यांचेच शिष्य होत.
 पं. विष्णू नारायण भातखंडे यांचे संगीताच्या क्षेत्रातले कार्य अजरामर आहे. वकिली सोडून त्यांनी या विषयासच वाहून घेतले आणि सर्व हिंदुस्थानभर हिंडून अनेक दुर्मिळ चिजा, राग व त्यांचे ग्रंथ मिळवून त्या चिजा नोटेशनने प्रसिद्ध करण्यास प्रारंभ केला. या सर्वांचा परिपाक म्हणजे 'हिंदुस्थानी संगीतपद्धती' हा त्यांचा ग्रंथ होय. या पद्धतीनुसार त्यांनी क्रमिक पुस्तकेही प्रसिद्ध केली. हा त्यांचा उद्योग एवढा अजस्र व अफाट होता की एका आयुष्यात तो त्यांनी पुरा केला हे सर्वानाच विस्मयजनक वाटते.
 भास्करबुवा बखले यांना संगीतज्ञ लोक या दुनियेतले अवतारी पुरुषच समजतात. त्यांचे नाव ऐकून गहिवरला नाही असा गवई विरळाच. त्यांचा कंठ जन्मतःच मधुर होता. किर्लोस्कर कंपनीला त्या वेळी एक स्त्री नट हवा होता. अण्णासाहेबांनी भास्करबुवांची त्यासाठी योजना केली. त्यांचे नाटकातले गाणे ऐकून वस्ताद बंदे अल्ली खां हे संतुष्ट झाले व त्यांनी त्यांना गाणे शिकवायचे ठरविले. पुढे इंदूर सुटल्यावर बडोद्यास ते फैज महंमद खां यांच्याकडे गाणे शिकले. त्यानंतर नत्थन खां यांच्याकडे व अल्लादिया खां यांच्याकडेही त्यांनी तालीम घेतली. त्यानंतर ते सर्व भारतभर हिंडले व गाण्यात त्यांनी अपार कीर्ती मिळविली. भास्करबुवांनी बाळकृष्णबुवांप्रमाणेच अनेक शिष्य तयार केले. मास्टर कृष्णराव, बालगंधर्व हे त्यांचेच शिष्य. गंधर्व कंपनीच्या स्वयंवर, विद्याहरण, द्रौपदी या नाटकांचे संगीत दिग्दर्शन करून संगीताचा दरबार त्यांनीच मराठी रंगभूमीवर खुलविला. त्यांनी दिलेल्या चाली अमर झाल्या आहेत. आणि त्यांनी महाराष्ट्रातील लहानथोरांच्या अंतःकरणात कायमचा प्रवेश केला आहे. 'भारत गायनसमाज' ही संस्था त्यांनीच स्थापन केली व पुण्याला आपली कायमची स्मृती करून ठेविली.
 महाराष्ट्राचे पाचवे स्वरश्री म्हणजे अब्दुल करीम खां हे होत. हे मूळ 'किराणा' घराण्याचे होते. यांचे मूळ पुरुष नायक धाेंडू हे आग्र्याजवळील किराणा या गावचे होते. त्यांनी प्रत्यक्ष श्रीकृष्णाजवळून विद्या संपादिली व ती आपल्या शिष्यांना दिली असे म्हणतात. अब्दुल करीम खां हे महाराष्ट्रात येऊन मिरजेला स्थायिक झाले आणि त्यांनी इतकी कीर्ती मिळविली की कोणी किराणाऐवजी त्या घराण्याला 'मिरज' घराणे म्हणतात.