पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८९
महाराष्ट्रीयांची कलोपासना
 

 या दृष्टीने संगीत, नाट्य, चित्रपट, नृत्य, चित्र, शिल्प या प्रमुख कला होत. त्यांतील संगीताचा विचार प्रथम करू.

शास्त्रीय संगीत
 मुस्लिम सत्तेच्या काळातील कलेचा मागे विचार केलाच आहे. गोपाल नायक या पंडितास अल्लाउद्दिनाने सक्तीने दिल्लीला नेले आणि त्यानेच तेथे संगीताचा प्रसार केला. आज उत्तर हिंदुस्थानी संगीत म्हणून दक्षिणेत आले आहे ते हेच संगीत. ते मूळचे दक्षिणेतल्या यादवांच्या दरबारातलेच संगीत होय.
 उत्तर हिंदुस्थानातून महाराष्ट्रात हे संगीत आणणाऱ्यांमध्ये पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, पंडित विष्णू दिगंबर पलुसकर, पंडित विष्णू नारायण भातखंडे, पंडित भास्करबुवा बखले, खांसाहेब अब्दुल करीम खां, गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे आणि संगीतसम्राट अल्लादिया खांसाहेब हे प्रमुख होते. 'सात स्वरश्री' या पुस्तकात श्री. गोपाळकृष्ण भोबे यांनी यांची चरित्रे देऊन त्यांचा महाराष्ट्रीय जनतेला परिचय करून दिला आहे. या सर्वांचे महाराष्ट्रावर अपार प्रेम होते. अब्दुल करीम खां आणि अल्लादिया खां हे तर नेहमी म्हणत की 'महाराष्ट्रासारखे रसिक इतरत्र आढळत नाहीत.' म्हणूनच तर ते महाराष्ट्रात येऊन कायमचे राहिले होते. इतर सर्व तर महाराष्ट्रीयच होते. तेव्हा महाराष्ट्राला संगीतात अग्रस्थान होते यात शंका नाही.
 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत महाराष्ट्रात आणून येथे अनेक शिष्य तयार करणारे पहिले गायनाचार्य म्हणजे बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे होत. त्यांचे गुरू वासुदेवबुवा जोशी आणि देवजीबुवा परांजपे यांनी त्यांच्या आधीच उत्तरेत जाऊन या विद्येचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला होता. पण हे दोघेही शेवटपर्यंत तिकडेच राहिले. म्हणून महाराष्ट्राचे आद्य गुरू बाळकृष्णबुवा हेच होत. पूर्ण सप्तकात अनायासे त्यांचा आवाज फिरत असे. आणि अनेक मोठ्या गवयांच्या आवाजाचा त्यांच्या कंठात समवाय साधलेला असे. १८८३ साली 'संगीतदर्पण' नावाचे मासिक त्यांनी सुरू केले व एका गायन समाजाची स्थापना केली. या समाजात डॉ. भांडारकर, महादेव चिंतामण आपटे, कुंटे, न्या. मू. तेलंग अशी बडी मंडळी होती. बाळकृष्णबुवा हे सर्व कार्य विनामूल्य करीत असत. आणि एकीकडे शिष्य तयार करीत असताना स्वतःची गायनतपस्याही त्यांनी अखंड चालू ठेविली होती.
 बाळकृष्णबुवांच्या नंतर त्यांचेच शिष्य पंडित विष्णू दिगंबर पलुसकर हे दुसरे स्वरश्री होत. ते प्रथम सांगली- मिरजेकडे राजाश्रयास होते. पण तो सोडून ते लवकरच उत्तरेत गेले व तेथेच त्यांनी आपली संगीत साधना केली. या क्षेत्रातले त्यांचे पहिले मोठे कार्य म्हणजे संगीत-विद्या जनतेत पसरवणे हे होय. गवई हे व्यसनी व लहरी असत. त्यांचे तस्त विसळण्यापासून त्यांची सर्व सेवा शिष्यांना करावी लागे. विष्णू