पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७८४
 

मूल्य आहे, अस्तित्वाचे अंतिम घटक म्हणजे संवेदनांचे आशय आणि अर्थ हे होत इ. सिद्धांत त्यांनी मांडले. 'वाङ्मयीन महात्मता' हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. पण त्यातील लय तत्त्वाचा महात्मतेशी संबंध जोडता येत नाही. प्रभाकर पाध्ये यांनी मर्ढेकरांच्या विचारांची चिकित्सा करून कलेच्या स्वरूपाविषयी स्वतःचे काही विचार मांडले आहेत. मर्ढेकरांच्या तत्त्वप्रणालीवर घेतलेल्या काही आक्षेपांचे त्यांनी निरसनही केले आहे. आजच्या मानसशास्त्राच्या व ज्ञानतंतुशास्त्राच्या आधारे त्यांनी हे सारे विवेचन केले आहे. त्यामुळे पाध्ये यांना साहित्यमीमांसेत एक आगळे स्थान प्राप्त झाले आहे.
 याशिवाय प्रा. कुसुमावती देशपांडे, पु. शि. रेगे, दि. के. बेडेकर, शरच्चंद्र मुक्तिबोध, द. ग. गोडसे, गंगाधर गाडगीळ, बालशंकर देशपांडे यांनीही या क्षेत्रात मोलाची भर घातली आहे.

५. चरित्र-आत्मचरित्र


 यानंतर चरित्र व आत्मचरित्र या विचारप्रधान शाखेचा विचार करून हे प्रकरण व एकंदर साहित्यविवेचन संपवावयाचे आहे.
 समीक्षेप्रमाणेच मराठीत पहिले आधुनिक पद्धतीचे चरित्र विष्णुशास्त्री यांनीच लिहिले आहे. ब्रिटिशांच्या पूर्वी येथे चरित्रे लिहिली गेली आहेत, नाही असे नाही. चक्रधरांचे लीळा चरित्र, नामदेवांनी लिहिलेले ज्ञानेश्वरांचे चरित्र, सभासदाची बखर शिवचरित्र, महीपतीसारख्यांनी लिहिलेली संतचरित्रे असे हे वाङ्मय विपुल आहे. पण प्रत्येक व्यक्तीला दैवी शक्तीने संपन्न करून टाकण्याची या सर्वांची प्रवृत्ती आहे आणि त्यांनी केलेल्या चमत्कारांवर त्यांचा भर आहे. त्यांना ऐतिहासिक दृष्टी मुळीच नाही. ब्रिटिश काळात प्रारंभी अनेक पाश्चात्य व पौर्वात्य पुरुषांची चरित्रे आधुनिक पद्धतीने लिहिली गेली. पण एक तर त्यांतली बरीचशी भाषांतरवजा आहेत आणि त्यांत माहिती देण्यावरच जास्त भर आहे. चरित्रनायकाचे व्यक्तित्व, त्याचे कार्य, त्याचे मूल्यमापन, त्याच्या गुणदोषांची चिकित्सा, त्याचे समाजातील स्थान यांचा विचार त्यांत नाही. म्हणून विष्णुशास्त्री यांनी लिहिलेले 'जॉन्सनचे चरित्र' हेच मराठीतले पहिले चरित्र, असे म्हणावे लागते. त्यांनी सामान्य व्यक्तीचे चरित्र लिहिण्यामागची नवी दृष्टी कोणती तेही सांगितले आहे आणि वर सांगितल्याप्रमाणे चिकित्सा केली आहे.
 त्यानंतर मराठीत चरित्रलेखनास प्रारंभ झाला. विष्णुशास्त्री यांचे चरित्र त्यांच्या बंधूंनीच लिहिले आहे. त्यात विष्णुशास्त्री यांच्या कार्याची व गुणदोषांचीही चिकित्साही केली आहे विष्णुशास्त्री यांचा आदर्श पुढे ठेवून काशीबाई कानिटकर यांनी डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र लिहिले आहे आणि चरित्रनायिकेचे अंतरंग दर्शन घडविण्यासाठी तिच्या खाजगी पत्रव्यवहाराचाही उपयोग केला आहे. ल. रा. पांगारकर हे नंतरचे मोठे चरित्रकार होत. मोरोपत, एकनाथ, ज्ञानेश्वर, तुकाराम व मुक्तेश्वर