पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८३
विचारप्रधान साहित्य
 

स्वतंत्र अध्यात्ममार्गच आहे. वास्तववाद, सौंदर्यवाद, व अध्यात्मवाद हे त्यांच्यामते साहित्याचे त्रिनेत्रच होत. द. के. केळकर यांनी 'काव्यालोचन' हा ग्रंथ लिहून साहित्यशास्त्रात मोलाची भर घातली आहे. फडके व खांडेकर हे कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. पण ते तितकेच चोखंदळ टीकाकारही आहेत. 'प्रतिभासाधन', 'लघुकथा- तंत्र आणि मंत्र,' 'मनोहरची आकाशवाणी', 'साहित्य आणि संसार' हे फडक्यांचे टीकाग्रंथ प्रसिद्ध आहेत. फडके कलावादी म्हणून प्रसिद्ध आहेत. खांडेकरांनी, 'गडकरी- व्यक्ती आणि वाङ्मय' हे पुस्तक आणि अनेक स्फुट निबंध यांतून आपले वाङ्मयविषयक विचार मांडले आहेत. ते जीवनवादी समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत.
 वाङ्मयाच्या इतिहासाचे लेखक हे वाङ्मयाचे समीक्षक असतातच. ते नुसता इतिहास देत नाहीत. तर त्या वाङ्मयाचे मूल्यमापनही तेथे करतात. या दृष्टीने वि. ल. भावे यांची कामगिरी अद्वितीय आहे. 'महाराष्ट्र सारस्वत' हा त्यांचा ग्रंथ अत्यंत महत्वाचा आहे. प्रारंभापासून पेशवाईअखेरपर्यंतच्या मराठी सारस्वताचा इतिहास त्यांनी या ग्रंथात दिला असून संतवाङ्मय, शाहिरी वाङ्मय, गद्यसारस्वत यांची समीक्षाही केली आहे. असाच दुसरा मोठा उद्योग म्हणजे डॉ. अ. ना. देशपांडे यांचा. प्रारंभापासून आजपर्यंतच्या सर्व मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहिण्याचे प्रचंड कार्य त्यांनी केले आहे आणि तसे करताना प्रत्येक लेखकाचे मूल्यमापनही केले आहे. गं. बा. सरदार यांनी अव्वल इंग्रजी काळातील मराठी गद्यवाङ्मयाचा इतिहास लिहिला असून त्याच्या मागच्या प्रेरणांची चिकित्साही केली आहे. अलीकडे पुण्याच्या साहित्य परिषदेने समग्र मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहिण्याचे काम अंगावर घेऊन तीन खंड प्रसिद्धही केले आहेत. प्रा. रा. श्री. जोग त्यांचे संपादक होते. त्यात अनेक पंडितांनी भिन्न भिन्न प्रकरणे लिहिली आहेत. इतिहासाबरोबर वाङ्मयसमीक्षाही ते करतात.
 त्यानंतरचे विख्यात समीक्षक म्हणजे प्रा. डॉ रा. शं. वाळिंबे हे होत. 'साहित्याचा ध्रुवतारा' हा त्यांचा पहिला टीकाग्रंथ होय. जीवन हा ध्रुवतारा होय, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. त्यानंतर 'वाङ्मयीन टीका', 'साहित्यमीमांसा,' 'प्राचीन भारतीय कला', 'साहित्यातील संप्रदाय' असे तत्त्वचर्चात्मक व बालकवी, गडकरी, माडखोलकर यांच्या साहित्याविषयी टीकात्मक असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले. पाश्चात्य व पौर्वात्य दोन्ही साहित्यशास्त्रांचा त्यांचा गाढ व्यासंग आहे. त्यांच्या ग्रंथांतून याचा पदोपदी प्रत्यय येतो. प्रा. वा. ल. कुळकर्णी हे एक ख्यातनाम टीकाकार आहेत. अर्थपूर्ण भावानुभव हा ललितकृतीचा अंतिम घटक त्यांनी मानला आहे. ललितकृतीचे मूल्यमापन साहित्यमूल्यांच्याच आधारे केले पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे.
 १९४५ नंतर बा. सी. मर्ढेकर यांचे नवे वाङ्मयीन सौंदर्यशास्त्र मराठीत आले. परंपरेचे धागे त्यांनी पूर्णपणे तोडून टाकले. सौंदर्य हे स्वतंत्र, स्वायत्त, आणि अंतिम