पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७७६
 

'परशुरामचरित्र', 'विज्ञानबोध','रामदास स्वामींचे प्रपंचविज्ञान' हे ग्रंथ आणि 'साहित्यधारा', 'विचारशलाका', 'विचार गुंफा', 'विवेकमंडन' 'विचारमंथन' हे निबंधसंग्रह निर्माण झाले. माटे देही सावरकरांप्रमाणे परंपराभिमानी होते. पण ते तितकेच बुद्धिवादी, भौतिकवादी व विज्ञाननिष्ठही होते. 'विज्ञानबोध', 'प्रयोगशाळेला शरण जा' हे त्यांचे निबंध-ग्रंथ याची साक्ष देतील. दलितांच्या कार्याला त्यांनी वाहून घेतले असल्यामुळे त्यांचे निबंध, लघुकथा, ग्रंथ यांत त्यांचा आत्मप्रत्यय पदोपदी दिसून येतो. हे प्रचीतीचे बोल आहेत, हे प्रत्येक पानातून जाणवते. 'चिंतन- शीलता, समतोल वृत्ती, सत्यान्वेषणाची इच्छा आणि डौलदार शैली यांची जोड विषयांना मिळाल्यामुळे केळकरांनंतरचे अव्वल दर्जाचे निबंधकार म्हणून माटे यांचाच उल्लेख केला पाहिजे', असे वि. स. खांडेकर यांनी म्हटले आहे, ते अगदी सार्थ आहे.
 द. के. केळकर हे अत्यंत विद्वान, साक्षेपी व सव्यसाची असे लेखक आहेत. 'काव्यालोचन', 'मराठी साहित्याचे सिंहावलोकन', 'साहित्यविहार' हे समीक्षात्मक ग्रंथ जसे त्यांनी लिहिले, तसेच 'संस्कृति- संगम,' 'उद्याची संस्कृती', 'संस्कृती आणि विज्ञान' हे इतिहास व विज्ञान या विषयांवरचे ग्रंथही त्यांनी लिहिले आहेत. 'वादळी वारे' हा त्यांचा निबंधसंग्रह आहे. सर्व इतिहास पाहता पाश्चात्य व भारतीय संस्कृतीत मूलतः काही तसा भेद नाही, हा सिद्धांत त्यांनी आपल्या 'संस्कृतिसंगम' या ग्रंथात मांडला आहे. या ग्रंथांतून त्यांची विद्वत्ता, व्यासंग, शोधक बुद्धी, निर्भयता हे गुण स्पष्टपणे दिसून येतात. विज्ञानाच्या साह्याने आपण इहलोकही आनंदमय करण्यास शिकले पाहिजे, असे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. 'आपल्या संस्कृतिसंपदेतील उणीव आम्ही आता ओळखली आहे. आणि म्हणूनच आपण निकटच्या भावी कालात ही उणीव भरून काढू व जागतिक राष्ट्रमालिकेत पूर्वीचे स्थान पुन्हा एकदा मिळवू,' अशी उमेद त्यांच्या लेखनातून सतत दिसून येते. 'खऱ्या विद्वानाचे चर्मचक्षू वर्तमानाचे प्रेक्षण करण्यात गुंग असतात, त्याचे ज्ञानचक्षू पूर्वेतिहासाच्या परिशीलंनात मग्न असतात. तर त्याचे तर्कचक्षु भावी परिस्थितीकडे वळलेले असतात. प्रा. केळकरांची विद्वत्ता अशी त्रिनेत्री आहे', असे शि. ल. करंदीकरांनी म्हटले आहे. त्याचा प्रत्यय केळकरांचे ग्रंथ वाचताना सारखा येत राहतो.
 आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर हे एक नामवंत ग्रंथकार म्हणून प्रसिद्ध आहेत. राजकारणी तत्त्ववेत्ते म्हणून आचार्यांचा महाराष्ट्रात लौकिक आहे. महात्माजींचे तत्त्वज्ञान व राजकारण यांचा सर्वत्र प्रसार करण्याचे महत्कार्य यांनी केले. 'आधुनिक भारत' हा त्यांचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ होय. ब्रिटिश कालातील राजकीय घडामोडींचे तात्त्विक विवेचन त्यात केलेले आहे. याशिवाय 'शास्त्रीय समाजवाद', 'लोकशाही', 'गांधीवाद', 'गांधीजीवनरहस्य' हे त्यांचे सर्वश्रुत ग्रंथ आहेत. 'स्वराज्य', 'नवशक्ती', 'लोकशक्ती' या पत्रांतूनही त्यांनी विपुल लेखन केले आहे.