पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७७५
विचारप्रधान साहित्य
 

भावनांची कोवळीक जास्त दिसून येते. रसाळ शैली व उत्कट जिव्हाळा हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होत.
 याच काळातले आणखी एक नामवंत ग्रंथकार म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे होत. 'अस्पृश्यतानिवारण' हे त्यांचे मुख्य कार्य. १९०६ साली 'ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस मिशन' ही संस्था त्यांनी स्थापन केली व त्या कार्याला वाहून घेतले. पण केवळ समाजसेवक म्हणून त्यांची कीर्ती नाही. ते संशोधक व लेखकही आहेत. अस्पृश्यतेच्या प्रश्नाचे त्यांनी प्राचीन काळच्या वेदवाङ्मयापासून बौद्ध, जैन सर्व वाङ्मयाचे संशोधन केले. आणि आर्याच्या आगमनापूर्वीपासून येथे अस्पृश्यता होती, असा सिद्धात मांडला. 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न' हा या विषयावरचा त्यांचा मुख्य ग्रंथ होय. याशिवाय या व एकंदर समाजसुधारणेच्या विषयावर त्यांनी लेख लिहिले आहेत. शिंदे- लेखसंग्रह या नावाने ते प्रसिद्ध झालेले आहेत. 'समाज- सुधारणा यशस्वी का होत नाही ?', 'मराठी वाङ्मय-तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र' 'आपले सामर्थ्य आपण वाढवावे', 'भावी समाजसुधारणेची तयारी' हे त्यांचे निबंध प्रसिद्ध आहेत. समाजसुधारणा यशस्वी का होत नाही, हे सांगताना आपली सुधारणा एकांगी व अपुरी आहे असे त्यांनी सांगितले आहे. त्याचा आशय असा की अस्पृश्यता, ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद ही हिंदुसमाजास जडलेल्या एकाच रोगाची बाह्य लक्षणे आहेत, या दृष्टीने सुधारक त्याच्याकडे पाहात नाहीत व यामुळे त्यांच्या कार्यास गती येत नाही. दीर्घ संशोधन, व्यासंग आणि प्रत्यक्ष कार्य यामुळे त्यांची दृष्टी कशी व्यापक व अनाग्रही झाली होती हे यावरून ध्यानात येते.
 १९२० नंतर निबंधकारांची तिसरी पिढी उदयास आली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे यातील अग्रगण्य होत. 'हिंदुराष्ट्रवाद' हा त्यांचा प्रमुख विषय होता. पण ते जितके परंपराभिमानी होते तितकेच विज्ञाननिष्ठही होते. 'दोन शब्दांत दोन संस्कृती', 'मंत्रचळ नव्हे, यंत्रबळ' या त्यांच्या निबंधांवरून हे ध्यानात येईल. रक्ताने लिहिणारे व शाईने लिहिणारे असे लेखकाचे दोन वर्ग एकाने केले आहेत. त्यातील पहिल्या वर्गात सावरकर येतात. 'जोसेफ मॅझिनी', 'सत्तावनचे स्वातंत्र्यसमर', 'हिंदुत्व', 'जात्युच्छेदक निबंध,' 'सहा सोनेरी पाने' अशांसारखे त्याचे ग्रंथ या वृत्तीतूनच निर्माण झालेले आहेत. त्यांची स्वातंत्र्यनिष्ठा, हिंदुत्वनिष्ठा, विज्ञाननिष्ठा या प्रत्येक ग्रंथात दिसून येते. आवेश, त्वेष, तळमळ, उत्कट भावना हे गुण त्यांच्या वाङ्मयात पदोपदी दिसून येतात. तरीही विद्वत्ता, व्यासंग यांना कोठेही ढळ पोचलेला दिसत नाही. त्यांची सर्व विधाने साधार, सप्रमाण केलेली असतात. त्यांतील युक्तिवाद बिनतोड असतो. उपहास, उपरोध, वक्तृत्व, नाट्य याही गुणांनी त्यांचे लेखन संपन्न आहे.
 श्री. म. माटे हे महर्षी शिंदे यांच्याप्रमाणेच मोठे समाजसेवक व तसेच मोठे लेखकही होते. अस्पृश्य, दलित यांच्या उद्धाराच्या कार्याला त्यांनी वाहून घेतले होते. पण समाजशास्त्राचा त्यांचा व्यासंगही गाढा होता. त्यातूनच 'अस्पृष्टांचा प्रश्न',