पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७७४
 

तख्त व भाऊसाहेबांचा घण' हे त्यांचे लेख म्हणजे स्वातंत्र्यसूक्तेच आहेत. वक्रोती हा त्यांच्या लेखणीचा मुख्य अलंकार होय. मराठीला हे लेणे त्यांनी दिले आहे. व्हॉल्टेअर, स्विफ्ट या पाश्चात्य लेखकांची शैली त्यांनी आत्मसात केली होती. त्यामुळे व्याजोक्ती, उपहास, उपरोध या अस्त्रांचे ते प्रभू होते. निबंधाप्रमाणे ते गोष्टीही लिहीत. पण त्या गोष्टी लघुकथेच्या रूपाच्या नव्हत्या. निबंधाला दिलेले एक निराळे वळण एवढयाच अर्थाने त्या गोष्टी होत्या. 'ध्रुवाची गोष्ट खोटी असली पाहिजे', 'अर्जुनाचा वेडेपणा', शिवाजीची एक रात्र' याचे मूळ रूप निबंधाचेच आहे. 'मराठांच्या लढाया' हा त्यांचा ग्रंथ चांगल्यापैकी आहे. पण शिवरामपंताची खरी कीर्ती 'काळा'तील निबंधांवरच अधिष्ठित आहे.
 वा. म. जोशी हे मुख्यतः कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. पण ते निबंधकारही होते. 'ध्येय हाच देव' व 'ज्ञान हे विष की अमृत' हे त्यांचे निबंध फार गाजलेले आहेत त्यांचा 'नीतिशास्त्र प्रवेश' हा ग्रंथही श्रेष्ठ दर्जाचा आहे. आपल्या विषयाचा ते खोल अभ्यास करीत आणि पूर्ण अनाग्रही बुद्धीने लेखन करीत. संशयवादी म्हणून ते प्रसिद्ध होते. आपल्या इतक्याच आस्थेने ते प्रतिपक्षाची बाजू पहात. आणि केव्हा केव्हा त्यांची डळमळ संपतच नसे. त्यामुळे ठाम विधान करणे त्यांना जड जाई. पण वरील निबंधांत हा दोष नाही. त्यामुळे त्यांनी थोडेच निबंध लिहिले तरी त्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
 वि. का. राजवाडे, चिं. वि. वैद्य, म. म. मिराशी, पं. सातवळेकर हेही मराठीतले श्रेष्ठ निबंधकार होते. पण त्यांचे ग्रंथ संशोधनात्मक आहेत. त्यांचा परामर्श त्या प्रकरणात घेतलाच आहे.
 डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हे मराठीतले एक सन्मान्य ग्रंथकार होऊन गेले. ज्ञानकोशकार म्हणून त्यांची कीर्ती आहे. याचा उल्लेख मागे आलाच आहे. पण त्यांची विशिष्ट बहुमोल कामगिरी म्हणजे महाराष्ट्राला समाजशास्त्रीय दृष्टीची दीक्षा देणे ही होय. 'भारतीय समाजशास्त्र' या त्यांच्या ग्रंथावरून हे दिसून येईल. 'प्राचीन महाराष्ट्र' हा त्यांचा ग्रंथ समाजशास्त्रीय दृष्टीने अभ्यसनीय आहे. 'महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण' हा ग्रंथ त्यांच्या स्वतंत्र विवेचक दृष्टीची साक्ष देतो.
 म. म. दत्तो वामन पोतदार हे इतिहाससंशोधक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे अनेक निबंध मराठी नियतकालिकातून प्रसिद्ध झालेले आहेत. 'प्रांतिक भाषांचे भवितव्य' हा त्यांचा निबंध प्रसिद्ध आहे. स्वतंत्र विचार, ठाकठीक रचना, आटोपशीर वाक्ये, साधी भाषा हे त्यांच्या निबंधांचे विशेष आहेत.
 साने गुरुजी हे एक अलौकिक प्रज्ञेचे लेखक होते. ज्ञानाच्या खाणीतले सुवर्णकण वेचावे आणि सर्वसामान्य वाचकांपर्यंत ते पोचवावे, अशी त्यांना तळमळ होती. 'भारतीय संस्कृती' हा त्यांचा निबंधसंग्रह प्रसिद्ध आहे. उच्च जीवनमूल्यांवर त्यांची दृढ श्रद्धा होती. ते कमालीचे भावनाप्रधान होते. त्यांच्या लेखनात पांडित्यापेक्षा