पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७७३
विचारप्रधान साहित्य
 

ग्रंथांत ठायी ठायी याचा प्रत्यय येतो. त्यांच्या निबंधांतून दिसून येणारे त्यांचे खंडन- मंडन कौशल्य असेच असामान्य आहे. 'मिल आणि मोर्ले', 'अध्यक्षाचे अधिकार', 'हिंदी स्वराज्यसंघ' यांसारख्या निबंधात त्यांचे हे नैपुण्य अगदी टिपेस गेलेले दिसते. 'हिंदुस्थानच्या प्रजेची अस्वस्थता', 'शिवाजी आणि ब्राहाण', 'राष्ट्रीय शिक्षण' या लेखांत धीरजपाल, मॉरिसन, हिस्टारिकस या आक्षेपकांचा टिळकांनी जो परामर्श घेतला आहे त्यात त्यांच्या बिनतोड युक्तिवादाची अशीच उदाहरणे सापडतील.
 व्याजोक्ती, आलंकारिक भाषा हे गुण टिळकांच्या लेखणीला मानवत नाहीत. प्रतिपक्षावर टीका करताना किंवा स्वमत मांडताना आधार, प्रमाण, युक्तिवाद व तात्त्विक सिद्धांत यापलीकडे ते सहसा जात नाहीत. 'हे लेखन निराधार आहे, एकतर्फी आहे, असमंजसपणाचे आहे, मानभावी आहे, अशास्त्रीय आहे', अशी साधी सरळ टीका ते करतात. पण त्यांच्या प्रतिपादनातील भाव मात्र अत्यंत जहरी व तीव्र असा असतो. त्यांनी दृष्टान्त दिलेच तर ज्योतिष, वैद्यक किंवा वेदान्त यांतले किंवा सामान्य व्यवहारातले अगदी गद्यमय असे ते असतात.
 पाश्चात्य विद्येचा जन्मभर अभ्यास टिळकांनी केला असला तरी त्यांच्या लेखनावर तिकडील कोणत्याही विद्वानाची छाया पडलेली नाही. विष्णुशास्त्री यांच्या लेखनावर मेकॉले, जॉन्सन यांची व आगरकरांच्या निबंधांवर स्पेन्सर यांची छाप असल्याचे जाणवते. पण टिळकांच्या मनावर प्रभाव होता तो वेद, उपनिषदे, महाभारत, रामायण यांचा. त्यांचे सर्व जीवनच या ग्रंथांनी घडविले होते. तेव्हा त्याचाच आविष्कार त्यांच्या लेखनातून होत असे.
 गीतारहस्य, मृगशीर्ष, आर्क्टिक होम या त्यांच्या ग्रंथांचे स्वरूप मागील प्रकरणातून स्पष्ट केलेच आहे. त्यांच्या केसरीतील लेखांच्या आशयाचे विवेचनही तेथे आलेले आहे. त्या सर्वावरून सर्व निबंधकारांत त्यांचे स्थान अनन्यसामान्य कसे होते, हे सहज ध्यानात येईल.
 तात्यासाहेब केळकर, शिवरामपंत परांजपे व वा. म. जोशी हे पुढच्या पिढीतले मोठे निबंधकार होत. तात्यासाहेब केसरीचे अनेक वर्षे संपादक होते. त्या पत्रात त्यांनी शेकडो निबंध लिहिले. शिवाय 'मराठे व इंग्रज', 'राज्यशास्त्र', 'हिंदी तत्त्वज्ञानाचा इतिहास', 'आयर्लंडचा इतिहास', 'फ्रेंच राज्यक्रांती' हे ग्रंथही त्यांनी लिहिले आहेत. हे ग्रंथ त्यांची चतुरस्रता, विद्वत्ता, भाषाप्रभुत्व, आकर्षक, आलंकारिक लेखनशैली यांची साक्ष देतात. विपुल माहिती, तर्कशुद्ध विचारसरणी, रेखीव मांडणी व अत्यंत प्रौढ व रम्य अशी भाषासरणी या गुणांनी त्यांचे निबंध संपन्न आहेत. मराठीचे जे भाषाप्रभू आहेत त्यांत केळकरांची गणना अग्रमालिकेत होईल यात शंका नाही.
 शि. म. परांजपे हे असेच दुसरे मराठीचे भाषाप्रभू आहेत. 'काळकर्ते' म्हणून त्यांची कीर्ती आहे. त्यांच्या 'काळ' पत्रातील निवडक निबंधांचे दहा खंड प्रसिद्ध झाले आहेत. त्यातील 'तलवारीचा हक्क', 'राज्यापहार आणि न्याय,' 'दिल्लीचे