पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५३
मरहट्ट सम्राट सातवाहन
 

घातली पाहिजे. इ. सनाच्या दुसऱ्या शतकात पंजाब, राजस्थान येथील यौधेयगणांनी कुशाणांचा नाश करून आपले स्वतंत्र्य पुन्हा प्रस्थापित केले होते. ' यौधेयानां जयः ' अशा अक्षरांनी अंकित अशी त्यांची नाणी सापडली आहेत. मालवांनीही शकांचा उच्छेद करून तिसऱ्या शतकात ' मालवानां जय: ' अशी मुद्रा करून आपली नाणी पाडली होती. (कॉप्रिहेन्सिव्ह हिस्टरी ऑफ इंडिया, खंड २ रा, पृ. २५५ ते २५७.) पण असे असले तरी ढोबळ मानाने भांडारकरांचे विधान खरेच आहे. ] भारतावर त्यावेळी केवढे संकट आले होते याची यावरून कल्पना येईल आणि त्यावरून सातवाहनांच्या साम्राज्याचे महत्त्व तेही ध्यानात येईल. भारतीय जनतेने सातवाहनांनी शकांवर मिळविलेल्या विजयाचे स्मृतिचिन्ह म्हणूनच त्यांच्या नावाने मूळची शक कालगणना अलंकृत केली.

गतिमान चित्रपट
 सातवाहनांचे साम्राज्य आंध्रदेश, कलिंग येथपासून माळवा, गुजरात, सौराष्ट्र, राजस्थान येथपर्यंत काही काळ मगधापर्यंत आणि दक्षिणेस कावेरीपर्यंत पसरले होते. आरंभीची दोनशे वर्षे या साम्राज्याला निर्बंध, अभंग शांतता लाभल्यामुळे तेथे भौतिक समृद्धीबरोबरच विद्या व कला यांचा विलक्षण उत्कर्ष झाला. सातवाहन हाल राजा तर त्याच्या विद्याभिरुचीसाठीच प्रसिद्ध आहे. त्याने संपादिलेला 'गाथासत्ततई ' ग्रंथ महाराष्ट्री प्राकृत भाषेत लिहिलेला आणि लोकजीवनाचे वर्णन करणारा भारतातला पहिलाच ग्रंथ आहे. अन्य प्राकृत भाषांत वा अन्य प्रदेशांत ग्रामीण वास्तवजीवनाचे वर्णन करण्याचे प्रयत्नच झाले नाहीत. ग्रामीण जनतेच्या जीवनावर तिच्याच भाषेत रचलेला हा अनन्य ग्रंथ होय. संस्कृतचे विख्यात इंग्रज पंडित डॉ. कीथ गाथासत्तसईविषयी म्हणतात की या काव्यातल्याप्रमाणे सामान्य जीवनाचे खरेखुरे अगदी वास्तव दर्शन संस्कृतात क्वचितच आढळते. महाराष्ट्रीय जनतेचे हेच वैशिष्ट्य आहे. आजही या लोकांच्या ठायी अशीच अकृत्रिम स्वच्छंद वृत्ती व राकट गोडवा हे विशेष तसेच दिसून येतात. (हिस्टरी ऑफ संस्कृत लिटरेचर, डॉ. कीथ, प्र. २२४.) डॉ. के. गोपालाचारी सातवाहनसाम्राज्याविषयी लिहिताना म्हणतात, सातवाहनसाम्राज्याचा इतिहास म्हणजे एक रम्य काव्य आहे. हा इतिहास जड नसून चैतन्याने रसरसलेला आहे. ते स्थिरचित्र नसून तो एक गतिमान चित्रपट आहे त्यातील काही प्रसंग भव्य आहेत तर काही भयानक आहेत. पण प्रत्येक चित्र जिवंत व भावपूर्ण आहे. त्यामुळे वैदिक, बौद्ध, जैन सर्व पंथीयांनी त्यांचे दिव्य पराक्रम पारंपरिक कथा व दंतकथा यांच्या रूपाने अमर करून कालांतराने शककालाचे शालिवाहन काल असे नामकरण केले यात नवल नाही ( काँप्रिहेन्सिव्ह हिस्टरी, खंड २ रा, पृ २९३ ).