पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
५२
 

त्यांचा प्रतिकार करील अशी संघटित साम्राज्यशक्ती एकही नव्हती. सर्वत्र लहान लहान क्षुद्र राजसत्ता विखरून राहिल्या होत्या. अशा वेळी दक्षिण भारताचीही स्थिती अशीच असती तर शककुशाणांनी दक्षिण भारताचा - म्हणजे पर्यायाने सर्व भारताचा ग्रास घेतला असता. पण अशोकाच्या मृत्यूच्या सुमारास म्हणजे इ. पू. २३६ च्या आसपास दक्षिणेत प्रतिष्ठान नगरीत एक बलशाली सत्ता प्रस्थापित झाली होती आणि शंभर वर्षांनी शककुशाणांच्या टोळधाडी येऊ लागल्या तेव्हा ही राजसत्ता साम्राज्यपदाला पोचून त्या परकी आक्रमणांना तोंड देऊन त्यांचा निःपात करण्यास समर्थ होऊन राहिली होती. सातवाहनांची राजसत्ता तीच ही बलशाली सत्ता होय. तिचाच इतिहास आता आपणास पाहावयाचा आहे.

दक्षिण संस्कृती
 सातवाहन सत्ता ही महाराष्ट्राच्याच नव्हे, तर अखिल भारताच्या इतिहासाला चिरंतन भूषणभूत होऊन राहील अशी सत्ता होती. एक तर भारताच्या इतिहासात विंध्याच्या दक्षिणेला निर्माण झालेली साम्राज्यप्रस्थापक अशी ही पहिलीच सत्ता होय. आर्यांच्या वसाहती प्रथम उत्तर भारतात झाल्या. त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाचा सर्व इतिहास उत्तरेत घडलेला आहे. रामायण, महाभारत या सर्व कथा उत्तरेतल्या आहेत. मगधातील शैशुनाग, नंद, मौर्य, शुंग ही सर्व साम्राज्ये उत्तरेतच झाली. मनू, याज्ञवल्क्य, पाणिनी, पतंजली, बुद्ध, महावीर, हे सर्व विंध्याच्या उत्तरेकडचे होत. याचा अर्थ असा की या काळापर्यंत भारताची सर्व संस्कृती ही उत्तर भारताच्या कर्तृत्वाची होती. सातवाहनांचे वैशिष्ट्य हे की त्यांनी दक्षिण भारताच्या इतिहासाला आणि संस्कृतीला प्रारंभ करून दिला. त्यांचे दुसरे अलौकिकत्व असे की इ. पू. २३५ ते इ. स. २२५ अशी चारशे साठ वर्षे या एका घराण्याने अखंड राजसत्ता चालविली. त्यातील पहिली दोनशे वर्षे तर तिचे वैभव अव्यय तेजाने सारखे प्रतिपच्चंद्ररेखेप्रमाणे वर्धिष्णूच होत राहिले. त्यानंतर काही वर्षे तिला पडता काळ आला. पण गौतमीपुत्र सातकर्णी या सम्राटाने शकांचा निःपात करून पुन्हा तिचे तेज वृद्धिंगत केले. साडेचार शतकांइतका दीर्घकाळ एकाच घराण्याने सत्ता चालविल्याचे उदाहरण भारताच्याच काय पण जगाच्या इतिहासातही दुर्मिळ आहे. सातवाहनांचेच शालिवाहन हे दुसरे अभिधान होते. त्या नावाची कालगणना शालिवाहन शक म्हणून विख्यात झालेली आहे. भारतात अनेक कालगणनांतून दोनच संवत् कायम टिकून राहिले आहेत. एक विक्रम संवत् व दुसरा शालिवाहन संवत्. डॉ. रा. गो. भांडारकरांनी म्हटले आहे की इ. पू. दुसऱ्या शतकापासून इ. सनाच्या चौथ्या शतकापर्यंत ( पुष्यमित्राच्या मृत्यू - पासून गुप्तवंशाच्या उदयापर्यंत ) शिलालेख व नाणी यात महाराष्ट्राचे सातवाहन वगळले तर कोणाही हिंदू राजाचे नाव आढळत नाही. ( कलेक्टेड वर्क्स, खंड १ ला, पृ. ३६ ) [ डॉ. भांडारकरांच्या या विधानाला, नवीन संशोधन पाहता, थोडी मुरड